#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

राजा राममोहन रॉय

राजा राममोहन रॉय यांना भारतीय प्रबोधनाचे जनक मानले जाते. ब्रिटिशांचे भारतातील राज्य स्थिरावत असताना ब्रिटिशांच्या आगमनाने भारतीय समाजात क्रिया-प्रतिक्रियांचे चक्र सुरू झाले होते. भारतीयांची गाठ अगदी वेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिकतेशी, मानसिकतेशी पडली होती. व्यक्ती, व्यक्तीची प्रतिष्ठा व व्यक्तीचे स्वातंत्र्य या बाबींना समाजरचनेच्या केंद्रस्थानी ठेवून राजकीय, सामाजिक व्यवहार करणारा ब्रिटिश समाज आणि समुच्चयात्मक पद्धतीने सामूहिक जीवन जगणारा भारतीय समाज या परस्परविरोधी वाटणाऱ्या संस्कृतींमध्ये चलनवलन सुरू झाले. या प्रक्रियेत भारतातील समाजधुरिणांसमोर दोन आव्हाने उभी होती. एक म्हणजे: ज्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे, ते सत्ताधारी, त्यांचा समाज, त्यांची संस्कृती, त्यांचे तत्त्वज्ञान यांचे आकलन करून घेणे. दुसरे म्हणजे : त्याच वेळी या सत्ताधाऱ्यांकडून भारतीयांच्या धार्मिक, सांस्कृतिक रूढींवर-प्रथांवर होत असणाऱ्या हल्ल्यांचा समर्थपणे प्रतिवाद करणे व प्रतिसाद देणे.
जन्म आणि शिक्षण : –
२२ मे १७७२ (१७७४?) रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळ त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.
तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.
भटकत भटकत ते तिबेट पर्यंत गेले. तिथे बुद्ध धर्माच्या प्रमुख भूमीत त्या धर्माचा अभ्यास चालू केला. परंतू तिथ शिकवल्या जाणार्‍या एकेश्वरवादाची मते त्यांना पटली नाहीत. त्यांचे मत त्यांनी उघड बोलून दाखवल असता त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, आणि प्रकरण जीवावर बेतल. त्यावेळी काही स्थानिक स्त्रीयांनी राम मोहन बाबूंचा जीव वाचवला. ह्या प्रसंगान त्यांच्या मनात स्त्रीयांविषयी अतिशय आदरभाव उत्पन्न झाला. दरम्यानच्या काळात रमाकांतबाबूंनी पुत्राला शोधण्यासाठी काही लोक पाठवले होते. वडीलांचा निरोप मिळाल्यावर राम मोहन बाबू पुन्हा एकदा घरी आले. घरी आल्यावर वडीलांनी त्यांच लग्न लावून दिल.
सती प्रथेशी संबंध आणि विरोध : –
इ.स. १८१२ मधे त्यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत. त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे.
भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्‍या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.
बंधू च्या मृत्यूनंतर अशाप्रकारे त्यांच्या पत्नीला देखील जाळल्यामुळ राम मोहन प्रचंड व्यथित झाले आणि त्यांनी सती प्रथे विरोधात मोहीम उघडली. राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्‍या स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत. ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता. त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणार्‍या स्त्रीयांची मोजणी सुरु केली. राम मोहन रॉय यांच्यामते संपूर्ण बंगाल प्रांतात (जो आजच्या पश्चीम बंगालपेक्षा बराच मोठा होता) प्रत्यक्षात सती जाणार्‍या स्त्रीयांची संख्या या आकडेवारिच्या दसपट तरी असेल. ज्येष्ठ बंधूंच्या पत्नीच्या मृत्यूनंतर राम मोहन यांनी थेट स्मशानात जाउन सती जाणार्‍या स्त्रीयांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंगी ते यशस्वी देखील झाले.
१८१८ मधे प्रथेला विरोध करणारा एक लेख प्रसिद्ध केला. यामधे एक प्रथेचा समर्थक आणि एक विरोधक यांच्या संवादातून त्यांनी सती प्रथेच्या समर्थनार्थ दिल्या जाणार्‍या कारणांच खंडन केल आहे. त्यांनी मांडलेले बहुतांश मुद्दे हे आजही जसेच्या तसे, लागू होतात.
ह्या लेखात त्यांनी चर्चेला घेतलेले प्रमुख मुद्दे म्हणजे स्त्रीया ह्या मुळातच पुरुषांपेक्षा हीन आहेत, त्यांची शारिरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे. स्त्रीया निर्बुद्ध असतात, निर्णय घ्यायला सक्षम नसतात. त्यांच्यावरती (चारित्र्या बाबतीत) विश्वास ठेवला जाउ शकत नाही . त्या फार भावनिक असतात. हे आणि इतरही काही मुद्दयांचा समाचार त्या निबंधात घेतला आहे.
त्या काळच्या प्रथेच्या समर्थकांनी ही सगळी कारण हे स्त्रीच अस्तीत्वच गौण असत, तिला तिचा पती हाच परमेश्वर असतो आणि त्याच्याशिवाय तिच अस्तित्वच नाही हे सिद्ध करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला होता अस दिसतय.  सती जाणे ही वरवर जरी धार्मिक प्रथा दिसत असली तरी अनेकदा एखाद्या स्त्रीला सती जायला लावण्यात लोभी नातेवाईकांचादेखील हात असे. ह्यामुळ धर्माचा सर्रास आधार याकामी घेतला जात असे. त्यामुळ १८३० मधे, सरकारन १८२९ मधे या अमानुष प्रथेवर बंदी घातल्यानंतर, राम मोहन बाबूंनी Suttee and the Shastras असा एक लेख लिहीला. यामधे त्यांनी वेद, स्मृती, भगवद्गीता यांतील अनेक श्लोकांचा आधारे या प्रथेला शास्त्राधार नाही हे दाखवून दिल. त्यात त्यांनी अंगिर आणि व्यास ऋषी यांचे प्रथेचे समर्थन करणारे तर मनु, याज्ञवल्क्य, भगवद्गीता यांचे ही प्रथा सक्तीची नसून सर्वस्वी ऐच्छीक असल्याचे दाखले दिले आहेत.
उपसंहार : –
ब्रिटीश कंपनी सरकारन १८२९ मधे कायदा करून यावर बंदी आणूनही १९४३ नंतर किमान ४३ स्त्रीया सती गेल्याची नोंद आहे.
४ सप्टेंबर १९८७ रोजी, राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील देवराला गावात १८ वर्षाची रूप कुंवर सती गेली. रूप कुंवरच्या सती जाण्याचे उदात्तीकरण करण्याच्या आरोपाखाली ज्या ११ लोकांवर गुन्हा दाखल केला त्या सर्वांना जयपूरच्या विशेष न्यायालयान “सबळ पुराव्याअभावी” ३१ जानेवारी २००४ रोजी मुक्त केल. याहून वाईट गोष्ट म्हणजे रूप कुंवर चे एक मंदीर देखील बांधण्यात आल आहे जिथ आता नियमीत यात्रा भरते आणि त्या यात्रेवर बंदी घालायला (सती प्रथेच उदात्तीकरण करायला कायद्यान मनाई असताना देखील) न्यायालयान नकार दिला आहे.
फलित : –
४ डिसेंबर १८२९ रोजी, राजा राम मोहन रॉय आणि इतरांच्या प्रयत्नाला यश येउन, सती प्रथा बंद करण्याविषयीच विधेयक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क गव्हर्नर जनरल, व्ह्यायकाऊंट काँबरमीअर कमांडर-इन-चीफ, डब्ल्यू. बी. बेयले आणि सर सी. टी. मेटकाफ यांच्या संयुक्त समीतीन संमत केल. १६ जानेवारी १८३० ला राम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेन्टीन्कला सती प्रथेवर कायद्यान बंदी घातल्याबद्दल अभिनंदन आणि आभाराच एक पत्र पाठवल. परंतू यानंतरही सती प्रथेच्या समर्थक धर्म मार्तंडांनी, तत्कालीन सर्वोच्च न्यायपीठ म्हणजेच प्रीव्ही कौन्सीलपुढे याचिका दाखल केली. दिल्लीचा मुघल बादशहा अकबर दुसरा याच्यावतीन त्याची तनखा वाढवून देण्यासाठी “राजा” हा किताब देउन राम मोहन रॉय यांची नियुक्ती झाली होती. त्या बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजा राम मोहन रॉय १८३० साली इंग्लडला गेले. तिथे असतानाच त्यांनी सरकारपुढे सती प्रथेविरोधात पुन्हा एकदा बाजू मांडली. ११ जुलै १८३२ रोजी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सीलपुढे या विधेयकाला विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली. इंग्लंडमधील स्टेपलटन या गावी २७ सप्टेंबर १८३३ रोजी या महात्म्यान या जगाचा निरोप घेतला. दक्षिण ब्रिस्टल म धील आर्नोस वॅले दफनभूमीत त्यांच दफन करण्यात आल.
कार्या : –
तत्कालीन भारतीय विचारवंत या दोन्ही आघाड्यांवर काय करावे, या पेचात होते. या दोन्ही आघाड्यांवर राजा राममोहन रॉय यांनी अतिशय समर्थपणे कार्य तर केलेच; पण आपल्या कार्यातून आधुनिक भारताची पायाभरणी करून तिची दिशाही सूचित केली. यासाठी त्यांनी एका बाजूला भारतीय परंपरा, धर्म यांची चिकित्सा केलीच; पण ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करून त्याचीही चिकित्सा केली (त्यातून त्यांनी ढीळपळीूंची कल्पना नाकारली), तर दुसऱ्या बाजूला सतीसारख्या सर्वस्वी अमानुष प्रथेवर सातत्याने टीका करून ती प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यात यशही मिळाले. या दोन्ही आघाड्यांवर लढताना, कार्ये करताना ब्रिटिशांबाबत त्यांनी संवाद, सहकार्य; प्रसंगी टीका यांचा वापर केला. धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शेतीव्यवस्था, न्यायव्यवस्था या विषयांवर चिंतन व लेखन केले.
राजा राममोहन रॉय यांच्या या साऱ्या कर्तृत्वावर इंग्लिशमध्ये, बंगालीमध्ये पुष्कळच लिहिले गेले आहे. मराठीत मात्र याचा दुष्काळच आहे. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात केवळ सतीबंदीची चाल आणि रॉय एवढेच समीकरण आढळते. यापेक्षा जास्त समग्र स्वरूपाची माहिती मराठीत उपलब्ध नाही. त्याचा परिणाम म्हणजे, अलीकडच्या तरुण पिढीला रॉय यांच्या विचारांची ओळखसुद्धा नाही. ही उणीव भरून काढून आजच्या पिढीला प्राथमिकरीत्या रॉय यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा एक चांगला प्रयत्न पंकज कुलकर्णी या तरुण अभ्यासकाने केला असून, “भारतीय प्रबोधनाचा जनक राजा राममोहन रॉय’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. एकूण 22 प्रकरणे व दोन परिशिष्टे; तसेच प्रसिद्ध अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांची विवेचक आणि पूरक प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.
धर्म, तत्त्वज्ञान, अर्थकारण, शिक्षण, पत्रकारिता, साहित्य, न्यायव्यवस्था आदी रॉय यांच्या विचारकक्षेतील सर्व पैलूंची प्राथमिक ओळख या पुस्तकातून वाचकाला होईल. ख्रिश्‍चन मिशनऱ्यांशी रॉय यांनी केलेला संघर्ष, तत्कालीन भारतीय समस्यांवर त्यांनी सुचविलेले उपाय हेही या पुस्तकात वाचायला मिळेल. काही प्रश्‍नांवर कुलकर्णी यांनी थोडे सविस्तर लिहायला हवे होते. उदाहरणार्थ : – सतीबंदी, सतीची कल्पना, तिच्या मागची आर्थिक दृष्टी व त्याबाबतचा संघर्ष याची फारशी कल्पना मराठी वाचकांना नाही. यानिमित्ताने ती झाली असती.

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect