#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

Friday, 14 February 2020

अश्रू


निर्भया, कोपर्डी, हिंगणवाडीच्या घटनेने संवेदनशील मने मृत पावल्यासारखी झालीत. आपण सुरक्षित नाहीच !  या विचाराने आजची महिला गलितत्राण पावल्यासारखी दिसतेय. 
का आपण माणूस म्हणून जगू शकत नाही? 
का आपल्यातील हव्यासाच्या भावना इतक्या खालच्या स्तरावर गेल्यात? 
दुसर्‍याची आई, बहीण, मुलगी तर जाऊ द्या ! पण, तुम्हाला तुमच्यातील माणूस सुद्धा दिसत नाही? 
दहा तोंडाच्या रावणाला आपण नाव ठेवतो, पण एक तोंडाचा माणूस एवढा क्रूर कसा झाला? 
काही  दिवसांपासून जीव घुसमटल्यासारखा झालाय. खूप व्यक्त व्हावंसं वाटतं, पण निःशब्द झालेय... माझ्या भावना या पंक्ती रूपाने आपल्यासमोर मांडत आहे...!😔

अश्रू..!

पंखांत माझ्या बळ देऊन, 
 पंख कोणी छाटले ?
नभात त्या दाणे पेरून, 
स्वप्न माझे हिरावले !😔


पाठीराखा होतास तू ! 
अन् पाठीत खंजर खुपसले ?
सबला होतेस मी तरी, 
बल तू दाखविले!


पारतंत्र्याचे दिवस गेले,
 स्वातंत्र्य कुठं मिळाले ?
तेव्हाही मीच ? आणि
आजही मलाच सती दिले !


तू वंशाचा दिवा होतास,  
मी पण पणती जाहले !
आयुष्य हरले मी ! अन् 
जीवन माझे तू हिसकावले !


लेक तुझी ! बहीण तुझी ! 
मी पण सर्वस्व जाहले ?
नैतिकता मेली तुझी ! 
अन् चटके आईनेही सोसले !


रात्रीच्या त्या एकांतात, 
कली किती अवतरले ?
देह माझा छिन्न करून, 
मनही विच्छिन्न केले !


हास्याच्या खोट्या पडद्याआड, 
कसले प्रेम दाखवले ?
शांत मला करून तू ,
सगळे चव्हाट्यावर मांडले !😔


आईबापाच्या डोळ्यांतील, 
आभाळ कसे फाटले ?
श्वास होतेस मी त्यांचा, 
अन् त्यालाच तू तोडले !


जगायचं होतं खूप मला ! 
आयुष्य हे कसे संपले ?
वासनांध तू ? अन् 
मला का जाळीले ?


कोणता तो गुन्हा? अन् 
पाप काय मी केले ?
फासावरती तू हवास ,
अन् जगातून मी गेले !


अबोल कळी तू पुन्हा खुडशील, 
व्याकुळ किती मी जाहले ?
वेदना जाण तू माझ्या, 
आता अश्रूही माझे गोठले !


....- आशा चिने 
बारा/दोन/वीस


Wednesday, 5 June 2019

जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९


जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९ 

     ५ जूनला नाशिक येथे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व रामशेज शिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन व रामशेज शिक्षण संस्था रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९ मध्ये प्रथमच "कविकट्टा" रंगला. 
      मा.पितामह हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनामध्ये सर्व सहभागींना आकर्षक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व विशेषांक देऊन गौरविले. 

     जीवनगौरवने साहित्यिकांना व्यासपीठ मिळून मिळवून दिल्याबद्ददल जीवन गौरवचे मनःपूर्वक आभार..

कविता सादरीकरण...
🎯 शब्द..!

कुरवाळिसी मायेने, प्रेम दाविती शब्द !
बाळ बने नटखट, लाडिक बनती शब्द !!

काढी वाभाडे सहज, परखड असे हे सत्य !
धार चढती जर शब्दांना, मन दुखविती शब्द !!

समज असे जर शब्दांत, घरे बनती स्वर्ग !
खेळ मांडीती घरांत, गुंता वाढवी शब्द !!

ध्येय असे जर शब्दांत, घडवी इतिहास स्तुत्य !
कौतुकाचे बीज पेरता, भविष्य बनवी शब्द !!

असे सामर्थ्य पराकोटीचे, करी सन्मान नित्य !
क्रोध होई अनावर, शस्त्र बनती शब्द !!



शिक्षण तज्ञ मा.भाऊसाहेब चासकर, जयदीप दादा व विजया ताई यांच्यासमवेत

असेन मी...नसेन मी... अक्षरी उरेन मी....


-----------------------------------------------

गुरूमाऊली कविकट्टा

प्रमुख उपस्थिती
मा. राजन लाखे(कविकट्टा प्रमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१६,१७,१८)
मा. उत्तम कांबळे    मा.शिवराम बोडके
(संमेलनाध्यक्ष)             (स्वागताध्यक्ष)
मा. हरिदास कोष्टी   मा.दीपक अमोलिक
(कविसंमेलनाध्यक्ष)        (कविकट्टा प्रमुख)
मा. रामदास वाघमारे (प्रमुख संपादक) 
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
मा. दिगंबर शिंदे(पुणे जिल्हा सहसंपादक)
समन्वयक: मा. मिरा वाघमारे, मा. संदीप सोनवणे, मा. निरूपा बेंडे व सर्व जीवन गौरव 
परिवार 
आयोजक
सौ. रूपाली बोडके सौ. वैशाली भामरे
नाशिक जिल्हा सहसंपादक
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य








शिक्षकाकडून आणि साहित्यिकांच्या साहित्यातूच समाजात बदल होणे शक्य - उत्तम कांबळे 




औरंगाबाद / प्रतिनिधी 
      शिक्षकच समाजात ख-या अर्थाने चांगला बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे शिक्षकाला साहित्याची जाण असणे महत्वाचे आहे असे मत दुस-या राज्यस्तरीय शिक्षक जीवन गौरव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मांडले.यावेळी विचारमंचावर स्वागताध्यक्ष शिवराम बोडखे, माजी संमेलनाध्यक्ष राजन लाखे ,पुणे जिल्हा संपादक डी.बी. शिंदे,  जीवन गौरव मासिक चे मुख्य संपादक रामदास वाघमारे, संपादक कल्याण अन्नपुर्णे, मु.अ. संदिप सोनवणे, वंदना सलवदे, आयोजक रूपाली बोडके, वैशाली भामरे,सरपंच जिजाबाई तांदळे,गावातील जेष्ठ नागरिक यांचेसह राज्यातील साहित्यिक, कवी, शिक्षक , जीवन गौरवचे सहसंपादक मोठया संख्येने उपस्थित होते. 
       जीवन गौरव मासिक  महाराष्ट्र राज्य व रामशेज हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणा-या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.  यावेळी संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, साहित्य हे माणसाला घडवत असते. जीवन सुंदर करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्फूर्ती देत असते. जुने साहित्य हे परंपरावादी असून ते मानवी जीवनात हवे तेवढे बदल करण्यास कारणीभूत ठरत नाही. ते साहित्य धर्म, जात, कर्मकांड, अंधश्रद्धा, रुढीपंरपरा, यामध्येच अडकले होते. स्वातंत्र्यानंतर फार बदल झाले. लोकशाही मूल्य आली. त्यामुळे समाजात फार बदल झाले. त्या साहित्यात माणुस केंद्रस्थानी आणला. माणसाला महत्व दिले. कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल यांनीही देव, धर्म जात यापेक्षा माणूसच श्रेष्ठ आहे हे ठणकावून सांगितले हे शिक्षकाने लक्षात ठेवायला हवे. त्यादृष्टीने साहित्य निर्माण व्हायला हवे. त्या खरेपणासाठी साहित्यिकाने साहित्यातून आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे. शिक्षक सतत जागरूक असला पाहिजे. तोच ख-या अर्थाने समाजात बदल घडवून आणू शकतो. यावेळी माझी संमेलनाध्यक्ष राजन लाखे यांनी मराठी भाषेसंबंधी व साहित्यासंबधी आपले मत मांडले. यावेळी संपादक रामदास वाघमारे यांनीही जीवन गौरव साहित्य संमलन घेऊन अनेकांना लिहितं, बोलतं करणे, समाजात लेखनीच्या माध्यमातून, शिक्षकाच्या हातून बदल घडवून आणणे हाच जीवन गौरव साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देश आहे असे सांगितले. संमेनाची सुरुवात ग्रंथदिंडीने संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष शिवराम बोडके, संपादक रामदास वाघमारे, डी. बी. शिंदे, आयोजक रूपाली बोडखे व वैशाली भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उद्घाटनानंतर प्रा. डॉ. सतीश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात डॉ. रत्ना चौधरी, वेच्या गावित व भाऊसाहेब चासकर आदि उपस्थित होते. त्यानंतर मुख्य सभामंडपात हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कविंनी कविता सादर केल्या. यावेळी उपसंपादक मीरा वाघमारे, संदीप सोनवणे, संतोष दातीर, कुणाल पवार, प्रा. अशोक डोळस, गीता केदारे, आदिंनी मार्गदर्शन केले. तर दुस-या हॉलमध्ये कविकट्टा डी. बी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याध्येही महाराष्ट्रातून आलेल्या विविध कविंनी कविता सादर केल्या. यासाठी दिपक अमोलिक, योगिनी कोठेकर, सीमा गांधी आदिंनी मदत केली. 
संमेलन स्थळी पुस्तकाचे विविध स्टॉल व  जेवनात आमरस, मांडे, कुडNयाचे खास आकर्षण ठरले , शेवटी प्रा.सतिश म्हस्के व संदिप ढाकणे यांनी सुत्रसंचलन केले. तर आभार संमेलन आयोजक रुपाली बोडके यांनी मानले.

    नंदुरबारला होणार तीसरे राज्यस्तरीय जीवन गौरव साहित्य संमेलन
     जीवन गौरव मासिक, औरंगाबाद च्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात येते. शिक्षकांच्या अंगी असणाNया सुप्त कलागुणांना वाव मिळावा, लेखनाचे कौशल्य निर्माण व्हावे म्हणून अनेक नवनवीन शिक्षकांना साहित्य प्रवाहात आणण्याचे काम हे मासिक करते.  २०२० मध्ये घेण्यात येणारे तिसरे जीवन गौरव राज्यस्तरीय साहित्य संमेलन नंदुरबार येथे घेण्याचे ठरले आहे. हे संमेलन व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी नंदुरबार येथील दिनेश वाडेकर व पिंपळनेर येथील प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी घेतली आहे. नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात फिरता चषक दिनेश वाडेकर व प्रा. डॉ. सतीश मस्के यांना संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, संपादक रामदास वाघमारे, हरिदास कोष्टी, रूपाली बोडखे, वैशाली भामरे, संतोष दातीर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन घेण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार वासियांना यामध्ये सहभागी होता येईल. त्याचबरोबर नंदुरबार वासियांना ज्ञानाची मेजवानीही मिळणार आहे.

 (c/p)


संयोजकांचे मनःपूर्वक आभार.....

Sunday, 9 December 2018

"खुदरंग"


दुनिया के बारे में बहुत सोचा..!
 लेकिन जब खुद के बारे में सोचा..!
 तो खुद को कुछ इस तरह पाया!...

"खुद"

आशाएँ मुझसें बहोत, मैं खुद एक जिद हूँ!
है यकीन खुद पें, मेरी दुनिया मैं खुद हूँ !!
ख्वाईशें मेरी हैं कम, मेरी उम्मीद मैं खुद हूँ!
चिरकें तुफानोंको, नई सुबह का रास्ता मैं खुद हूँ!!
- आशा चिने


Monday, 3 December 2018

मन अथांग सागर



मन अथांग सागर,

मन अथांग सागर ,जणू मोकळा श्वास,
घेई कवेत कित्येकांशी, कधी शांत लहर।

घाली गवसणी चहूकडे,जणू आकाशी खग
फिरून येई घराशी,घेई पिल्ला गळाभेट।

मन किती खेळकर, जणू तान्हुलं बाळ
दौडी अखंड अंगणी, परी शोधिशी माय।

मन किती जपशी? शोधशी तू कुठवर?
अवखळ परी चंचल, न ये हाती स्वप्नांत।

भोगशी किती स्वातंत्र्य, शोधशी तू काय?
धावशी अहोरात्र मना, करशी कुठवर सैराट?

कधी सुख अन् कधी दुःख, माया कर अपार,
दिससी तू न कुठवरी, आहेस परी तू सुंदर।

मन डोलारा इच्छेचा, कधी कठोर त्या भावनांचा,
विचारांच्या गर्दीचा , सुंदर विश्वाच्या प्रगतीचा।


✍ लेखन: 

आशा ज्ञानदेव चिने
https://twitter.com/aashachine/status/1069643925353373696?s=09

प्राथमिक शिक्षिका, 

जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर, नाशिक

Friday, 30 November 2018

स्पर्धा




स्पर्धा

जिंकायची लत लागली की-

मनात एकच स्मशान शांतता पसरते।
हार पचवणे असाध्य रोगासारखे वाटू लागते।
बोलायचे बरेच असते अन् सुचत काहीच नसते।
आपलेच उत्कृष्ट हा आत्मविश्वासही ढासळून जातो।
आपल्यापेक्षा दुसऱ्याला सरस म्हणताना जीभ चाचरते।
अपेक्षांचे ओझे उपेक्षांनी घेतल्यासारखे जाणवू लागते।
दुसऱ्याच्या गाली हसू अन् आपल्या मात्र नयनी अश्रू लपत नसते।
स्पर्धेसाठीच्या विषयाची निवड चुकल्यासारखी जाणवू लागते।
जीवतोड केलेल्या मेहनतीचे पंख छाटल्यासारखे वाटू लागते।
टाळीचा आवाज अन् दुसऱ्याच्या विजयाचा जयघोष मनावर तलवारीचे घाव घालतो।
शरीरात ताप फणफणल्यासारखा अन् पाऊल जड वाटू लागतो।
सुसाट धावणाऱ्या एखाद्या एक्सप्रेसला अचानक शेवटचा थांबा मिळून जातो।
असे असते तर तसे झाले असते अन् तसे असते तर असे झाले असते- अशा भविष्यवाणीने काहूर माजते।
काय चुकलं? का चुकलं? कसं चुकलं? शोधात मन भराऱ्या घेते।
स्पर्धा नक्की कोणाशी? स्वतः तल्या स्पर्धकाशी की ढासळलेल्या आत्मविश्वासाशी? हेच कळत नसते...


क्षण
तालुकास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा 
दि 18/1/2018
सायं 6..00

Saturday, 13 January 2018

“ उगीच ”

“ उगीच



आज का थांबले?"उगीच"
त्या अनोळखी
वळणापाशी ,
माझ्या मनीचे चिटपाखरू
भुर्रकन उडाले
आकाशाशी


झुकल्या नजरा खाली

आठवण काढून ती कोवळी ,
पायानेच काढली भूवरी
कधी नव्हे ती सुंदर नक्षी ।


"उगीच" आभास का अनोखा झाला ?

का एकाकी क्षण खुलून आला ?
गाली आलेल्या स्मितहास्याने
आरसा सुद्धा लाजून गेला ||





काव्यलेखन
श्रीमती आशा चिने 

Sunday, 31 December 2017

आशा









जुने-नवे काही नसते,
विचारधाराच त्या बदलत असतात ।
त्याच मखमली चादरीवर,
नक्षी नव्याने विणायच्या असतात ।

वर्ष सरले कसे म्हणता ?
स्वप्न काठांवरून ओथंबू द्या ।
किनार करून नव्या वर्षाची,
झरा बनून खळाळू द्या ।

नसेलही कळीचे फुल झाले,
नसेलही श्रावणात मेघ दाटले ।
आठवणी जुन्याच आंबट-गोड,
पुन्हा नव्याने उजळू द्या । 

सुंदरशा या जीवन चित्रात,
रंग नव्याने भरू या ।
होईल उष:काल आनंदाचा,
अशी "आशा" करू या ।

काव्यलेखन
श्रीमती आशा चिने 

Sunday, 17 December 2017

कथा स्नेहसंमेलनाची

📙📙📙📙📙📙📙📙

माझ्या कविता सदर
📙📙📙📙📙📙📙📙

कथा स्नेहसंमेलनाची 



माझा उपक्रम
स्नेहसंमेलन व महिला मेळावा
उपक्रम एकाच दिवशी असतो
कारणही तसेच -उपस्थिती चांगली असल्याने कार्यक्रम फुलतो
...
सध्या तयारी चालू असल्याने सुचले!


कथा स्नेहसंमेलनाची 
💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃

मॅडम-मॅडम स्नेहसंमेलन कधी घेणार?
घेऊ..! थोडा अभ्यास आधी करूया!
मॅडम, तुम्ही सांगाल ते ऐकू,
पण, आधी आमचे डान्स घ्या।

सर्वांनाच कसे आवडते? खेळायला अन् नाचायला,
हा उपक्रम सांगून गेला, विद्यार्थ्यांना शाळेकडे वळायला।

सगळं कसं डान्समय, वातावरण अन् विचारही,
शिक्षकांनी आपला डान्स आधी घ्यावा,म्हणून आधीच अभ्यास उरकलेला।

कधी धड प्रश्नांची उत्तरे न दिलेले, करताय चर्चा इवल्या-इवल्या,
रिकामा वेळ असो वा मधली सुट्टी, डान्सच्याच गप्पा रंगलेल्या।

दुसरी कोणाचीच मदत नको, मॅडम तुम्हीच डान्स घ्या,
बरं! चला म्हणताच, एकच कल्लोळ केलेला।

गाणं कोणतंही घ्या पण, स्टेप करणार मॅडमनेच दिलेल्या,
स्वारी स्वप्नातही जाम खुश, दरम्यान शाळाही लवकरच भरणार।

मला छान डान्स येतो ऐकून, उगाचच जास्त करणार,
"सर्वांनाच डान्स"ही उक्ती, मग कामच करून जाणार।

अबोल कळ्याही खुलणार, अन् खुललेल्या तर टवटवीत होणार,
शाळाच काय अहो गावंच, गाणार अन् नाचणार।

जेवण जास्तच अन् झोपही मस्तच, उपस्थिती अन् गुणवत्ताही टिकणार,
सर्वांगीण विकास साधत, स्नेहसंमेलन दरवर्षीच येणार।

अहो हे काय थोडं ? आईही स्वप्न बघणार!
मुलांचं उरकलं म्हणजे आपलाही महिला मेळावा होणार!

कधी सभेला न येणारी माता, उगीच शाळेत येणार,
झाली का तयारी म्हणत,मतं जाणून घेणार।

मीही लवकरच आहे,म्हणत खुश करून देणार,
किती छान गंमती! दररोज कोणाला सांगणार?

विदयार्थ्यांना वाटतं की, माझी आई स्नेहसंमेलनाला येणार,
पण, खरं सांगू! स्नेहसंमेलन एक बहाणा,
मातेची स्वारी तर मेळाव्यातच खुश होणार।

मागच्या वेळेस नाही जमलं, ह्या वेळेस तिला दाखवणार,
मलाही सर्वच जमतं म्हणून किचनमध्येच तयारी करून घेणार।

दोरी उड्या मध्येच फुगडी, कबड्डी समजून मारतेय उडी,
चमचा-लिंबू नाही पोहे खायचेय, आवाज येताच धावतच खडी।

स्नेहसंमेलनाची गंमत-जंमत न्यारीच,
उत्साहाचे वातावरण सगळीकडे, औत्सुक्य अन् प्रगतीही खरीच।

💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃

📙📙📙📙📙📙📙📙
  श्रीमती आशा चिने 
📙📙📙📙📙📙📙📙

Sunday, 10 December 2017

आयुष्याचे काय..!


आयुष्याचे काय...!
     रचली तर कविता...गायले तर गीत,
     नाहीतर... शब्दांचा फेरफटका।

आयुष्याचे काय...!
     वाचले तर शब्द...जाणली तर भावना,
     नाहीतर... रिकाम्या जागा भरा।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर बेमोसमी... अनुभवले तर श्रावण,
     नाहीतर कोरडा चिंब-दुष्काळ।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर हिरवळ...ओल्या दवाची अन् कोरड्या त्या मनाची,
    नाहीतर सूर्य अस्ताचा अन् मेघ परतीचे।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर सूर सनईचे...छेडून तार हृदयाचे,
     नाहीतर गर्दीतल्या त्या एकटेपणाचे।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर किती सरळ आणि सोप्पे..! आयुष्य हे दमडीचे,
     नाहीतर कोडे हे अगणिक,आयुष्य न समजल्याचे।

आयुष्याचे काय...!
    म्हटले तर खूप नाही चांगले जगा... आयुष्य किती सुंदर ते बघा,
    या आयुष्याच्या गणितातील चिन्हे, एकदा बदलून तर बघा।


श्रीमती आशा चिने

Sunday, 5 November 2017

स्वागतगीत

स्वागतगीत



आनंदाचे क्षण हे सारे...
हर्ष मनी हा आपल्या वाटे...२ -नाचू गाऊया...
स्वागता sss आपुल्या स्वागता sss ||धृ||

सभा मंडपी आगमन आपुले...
गुणीजन व स्वकीय सगळे..२ - हर्षे वंदूया... 
स्वागता sss......................................….... ||१||

आगमन बघून अतिथींचे...
मनामनांतून शब्दसुमने...२-आपण वर्षूया..
स्वागता sss......................................….... ||२||

आशा चिने

Saturday, 4 November 2017

मॅडमही शिकल्या..!

मॅडमही शिकल्या..!

मी एक शिक्षक !, तो असावा सर्वांगीण,
मी आहे का तशी?, म्हणून बघण्यासाठी घेतली दुर्बीण ।

वर्गात शिरताच, शोधला खडू आणि फळा,
न बोलताच काही, केला काळाचा गोरा।

हळू-हळू कुजबुज, "भारीच मॅडम" बापरे!
समोर हे काय चाललं? ,तुला समजलं काय रे?

अरे! यांनाही 'शिकवाया' हवं, गुपित हे उमगलं,
विचारले काही प्रश्न तर..., यांना काहीच नाही समजलं!

डोके माझे चक्रावले , विचारांचे झाले वाद,
हळू..हळू..हळू..! , विद्यार्थ्यांच्या गेले पास।

साहित्याने भरला वर्ग, आणले मणी-गोट्या-खडे,
इवल्या-इवल्या हातांतून, एक-दोन-तीन पडे।

हातांत होते किती? पडले किती? उरले किती?
शोधता-शोधता उमगले, गणिताची गेली भीती।

गंमती-जमती करत, आला तास भाषेचा,
अक्षर-शब्द-वाक्य, वाचण्या-बोलण्या-लिहिण्याचा।

शब्दांचे रचू डोंगर, कवितांच्या गुंफू वेली,
आनंदाच्या हिंदोळ्यावर, आपण सारे गाऊ गाणी।

ऑडिओ-व्हिडीओ-ब्लॉग्ज, कित्ती कित्ती क्लुप्त्या,
मोबाईल-टॅब-इंटरनेट, याशिवाय झाल्या नसत्या।

ब्लॉग्ज झाले-व्हिडिओ बनवले, अन् शब्द फुलोरे कवितांचे,
रचनावादाचे गिरविता धडे, भान माझे हरपले।

शाळा सजल्या-विद्यार्थी शिकले, खडू अन् फळा नकळत गेले,
मार कसला? छडीही गेली, आनंदाचे क्षण हे आले।

नव्या क्लुप्त्या अन् नव्या पद्धती, गोष्टी नव्या उमगल्या,
ज्ञानरचनावाद समजता समजता, मॅडमही शिकल्या।

चालता-बोलता-लिहिता, मीही कवी झाले,
किचन असो वा बाथरूम, गीत गाऊ लागले।

रिकामा वेळ आता नसतोच, बसलं की काहीतरी सुचतंच,
'मस्तच जमलंय' म्हणत, गालावर हास्य हे फुलतंच।

मग! कशी वाटली कविता?
जमली का मला?
आवडली असेल तर
काहीतरी बोला ...!!!!!

दि. ४/११/२०१७ 

 धन्यवाद...!!!

Monday, 16 October 2017

शुभ करा दिपावलीला

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
शुभ करा दिपावलीला,
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

हर्ष हा किती,या दिपावलीला,
आनंदे जगुया, क्षणा-क्षणाला,
सोडा मनमुटाव, विसरा रागाला,
गोड करा या, वर्षाच्या सणाला।

सप्तरंगांची रांगोळी काढुया ,
सगळेच रंग त्यातुनी भरूया,
दीपक अंगणी लावूया,
फटाके नभी उडवूया।

अविस्मरणीय या क्षणाला,
जपुया सर्वांच्या मनामनाला,
भुकेल्यांच्या या भुकेला,
गरिबांच्या त्या घासाला।

या गोड गोड फराळाला,
सुख-दुःखाच्या मेजवानीला,
ठेवूया भान , देऊया मान,
वडीलधाऱ्या या संस्कृतीला।

शुभ करा या दिपावलीला,
आपुल्या त्या उनाड मनाला,
शुभ्र विचारांची आरास ही सजवा,
नवतेजाची गरज या समाजाला।।


आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....
🎆🎇🎆🎇🎆🎇🎆
🖍कविता लेखन
   आशा चिने

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect