#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Monday 13 April 2020

"एक होता कार्व्हर" पुस्तक समीक्षण


"एक होता कार्व्हर" 
लेखिका वीणा गवाणकर

मूळ पुस्तक -

1) "जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' - शर्ली ग्रेयम आणि जॉर्ज लिप्स्कम

2) "George W. Carver" - Reckham Holt
3) "The Man Who Talks With The Flower" - G. Clerk

मूल्य - 225 रुपये


एक होता कार्व्हर वाचावं, असं खूप दिवसांचं चाललं होतं. पण का कुणास ठाऊक ? माझ्याकडून ते कधी वाचून झालंच नव्हतं.

पण लागलीच, काल ते पुस्तक मी हातात घेतलं. आणि वाचलं. चांगलं दोनदा! खरंच सांगते ! वाचून मी अगदी निःशब्द झालेय, भारावून गेलेय ! काय आणि किती लिहू ? एवढं महान कार्य आहे कार्व्हर यांचं ! हा अमेरिकेतील महामानव आहे, जो अमेरिकेच्या उद्धारासाठी जन्माला आला !

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिका वीणा गवाणकर यांचं मनोगत दिलेलं आहे. मुलाबाळांत रमलेली ही गृहिणी, तिचं वाचन वेड आणि त्यातून उदयास आलेलं हे, "एक होता कार्व्हर" हे पुस्तक.

पुस्तक वाचण्यास सुलभ व्हावं म्हणून अनुक्रमाणिका दिलेली आहे आणि त्यानुसारच पुस्तकाची रचना आहे. त्यामुळे पुस्तक वाचण्याचा कंटाळा येतच नाही.

पुस्तक वाचताना मला भावलेल्या अशा काही ठळक मुद्द्यांचा येथे समावेश करत आहे. मी कितीही ठरवलं पुस्तकाचं परीक्षण अथवा समीक्षा करावी, तरीही माझ्या तोकड्या बुद्धीला ते कदापि जमणार नाही.

ही कथा आहे अमेरिकेतील एका निग्रो व्यक्तीची. निगर किंवा निग्रो या व्यक्तींना अमेरिकेच्या गोर्‍या लोकांनी कसं उपेक्षित ठेवलं !  कार्व्हर यांच्या "निग्रो" असण्याने आयुष्य समृद्ध बनवणाऱ्या अनेक गोष्टींपासून त्यांना वंचित व्हावं लागलं. अनेक सुंदर उपयुक्त गोष्टींचा आस्वाद त्यांना कधीच घेता आला नाही. मोकळेपणी फिरावं, कला प्रदर्शनात संगीताच्या मैफलीत जावं, असं कधीच जुळून आलं नाही. कारण अशा ठिकाणी निग्रोना मज्जाव असे. सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्रवेश नसे. आजूबाजूने होणारी कठोर टवाळी त्यांना सहन करावी लागे. वर्ण द्वेषाची तीव्रता त्यांना सोसावे लागे.

उत्तर अमेरिकेतील विझोरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर राहणारे जर्मन शेतकरी मोझेसबाबा कार्व्हर व सुझनबाई राहात असतात. ते मेरी नावाच्या गुलाम नीग्रो स्त्रीला सातशे डॉलर्सला विकत घेतात. गुलामगिरी पसंत नसतानाही पत्नीच्या मदतीसाठी त्यांनी मेरीला विकत घेतलेले असते.  मेरी सोबत तिची तीन मुलंही असतात. एका रात्री गुलामांची एक टोळी गुलामांना चोरण्यासाठी येते व ते मेरी व तिच्या दोन महिन्याच्या मुलाला चोरून नेतात. गावकऱ्यांच्या मदतीने मोझेस आपला उमदा घोडा देऊन त्याबदल्यात मेरीचा दोन महिन्यांचा मरणोन्मुख असलेला मुलगा सोडवतात. काड्या-मुड्यांचे हातपाय असलेले, दुबळे व मुके पोर. जेमतेम श्वासोच्छवास करणारं काळं, मुटकुळं, कोणत्याही घटकेला आजका देईल, असं हे मूल ! पण सुझनबाई त्याची शुश्रूषा करत होत्या.

डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजूच्या ओझार्क टेकड्या फळा-फुलांनी बहरू लागल्या होत्या. त्या बहरलेल्या निसर्गात कार्व्हरचा तो अनाथ पोर सुखावत होता. या एकाकी अबोल मुलाचा मित्रपरिवार म्हणजे मुलखावेगळा. रानातली झाडं- झुडपं, पक्ष्यांची पिल्ले, डब्यातले छोटे मासे, हाच त्याचा गोतावळा. त्यांच्या सहवासात तो तन्मय होई. त्याला बागेत काम करायला आवडे म्हणून त्याला माळीदादा म्हणून हाक मारू लागले. मोठा भाऊ "जिम" आपलं नशीब आजमवायला डायमंड ग्रोव्ह सोडून गेला. छोटा मात्र तिथेच राहिला. छोट्याच्या आंगची प्रामाणिक आणि विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबाने त्याचं नामकरण केलं "जॉर्ज".

द्राक्षाची लागवड करायची होती म्हणून त्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी मोझेसबाबा स्विस शेतीतज्ञ श्री. यायगर यांच्याकडे जॉर्जला घेऊन गेले. यायगर छोट्या जॉर्जच्या हुशारीवर खूष होते. जॉर्जने बारीकसारीक सूचना तंतोतंत पाळल्या होत्या. द्राक्षवेलीची उत्तम निगा राखली होती. वाळवी, किडीपासून वेलींचे रक्षण केले होते.  निघते वेळी यायगर यांनी जॉर्जला एक पुस्तक भेट दिले होते. त्यांच्या "नीओशो" गावात "निग्रोंच्या" शाळेची सोय होती. तिथे जॉर्जला शाळा शिकण्यासाठी पाठवायचे होते. म्हणजे आता त्याला कार्व्हर कुटुंबापासून दूर राहावे लागणार होते.

दहा वर्षांचा तो अनाथ, पोरका जीव, ज्ञात असलेला सुरक्षित जग सोडून अज्ञाताकडे झेप घेत होता. तो निघाला - ज्ञानयात्रेला.

दिवसभर शाळा, त्यानंतर पोटाचा प्रश्न, राहण्याची सोय ?  सगळेच प्रश्न. त्याच्या बोलण्यात थोडी सुधारणा झाली होती. अडखळणंही बरंच कमी झालं होतं. निसर्गदेवतेच्या सानिध्यात रमणे हा त्याचा स्थायीभाव होता, निसर्गाच्या सहवासात त्याला आनंद, शांती मिळेल. जॉर्ज अत्यंत अभ्यासू वृत्तीचा, उत्सुक नजरेचा, तल्लख बुद्धीचा होता. त्याच्या अंगी नीटनेटकेपणा, सफाई, विणकाम, शिवणकाम, चित्रकला, संगीत, वादन, स्वयंपाक करणे, धुणं धुणे, असे नानाविध गुण होते. त्याची लांबसडक बोटे कुठलंही कसब चटकन आत्मसात करी. लोकही त्याच्या गुणांमुळे, कामसू वृत्तीमुळे त्याला जवळ करू लागले.

एका निग्रो कैद्याला शेकोटीच्या उफाळणाऱ्या ज्वालांमध्ये जाळणाऱ्या घटनेने, त्याचे मन व्यथित झाले. काही काळे तर काही गोरे. शेवटी चामडीचाच रंग. कातडीच्या रंगाचा इतका साधा अर्थ नाही. फार फार वेगळा आहे, हे त्याच्या लक्षात आले. त्याच्या पोटात ढवळलं, भडभडून आलं. आतडी घशाकडे येऊ लागली. त्याने गाव सोडलं. गुलामीचा समुद्र, आभाळाएवढा दारिद्र्य, खडतर जीवन, अनाथ, अनिकेत अवस्था ! स्थिर होण्यासाठी तसूभरही सहारा नसलेलं,  हे पोर. अशातच देवीच्या साथीने एकुलता एक भाऊ "जिम" बळी गेला.

आत्तापर्यंत तो "जॉर्ज कार्व्हर" म्हणून ओळखला जाई. कारण शाळेत नाव नोंदवताना जॉर्ज, एवढंच नाव पुरेसं नव्हतं. पण आणखी एक जॉर्ज कार्व्हर होता जो गोरा होता. त्याचं पत्र याला येऊ लागल्याने पंचायत झाली, म्हणून याने दोन नावांमध्ये त्याने W घुसवला. लोकांनी डब्ल्यू चा वॉशिंग्टन बनवला, जॉर्जनेही ते स्वीकारलं. आता काळा जॉर्ज, "जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर" झाला.

ज्ञानासाठी दाही दिशा गुंडाळणारा हा पोर आता शालांत परीक्षा पास झाला होता आणि विद्यापीठाने प्रवेश देण्यासोबतच त्याला शिष्यवृत्तीही बहाल केली होती. जे नको होतं, तेच आता त्याला ऐकायचं होतं. विद्यापीठाच्या प्रमुखांनी त्याला, अर्ज करणारा व्यक्ती विद्यार्थी बुद्धिमान जरी असला, तरी तो कृष्णवर्णी निग्रो आहे. आम्ही निग्रो मुलांना प्रवेश देत नाहीत. कदाचित असा प्रवेश मागणारे, तुम्हीच पहिले आहात. शिकून तुम्ही काय करणार आहात? तुम्ही वेळ दवडत आहे. " असे म्हणून अध्यक्षांनी त्याला प्रवेश नाकारला. "काळ ईश्वराधीन आहे. ईश्वरेच्छेनेच माझी वाटचाल चालू आहे", असं जॉर्जने त्यांना उत्तर दिलं.

उत्साही तरुण, पुस्तकांची दुकानं, खानावळी, तयार कपड्यांचे दुकान तुडवत जॉर्ज गावभर भटकला. अनेक अडचणींतून, संकटांतून निघालेल्या जॉर्जच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत होते.  नंतर त्याला सिंप्सन कॉलेजला ॲडमिशन मिळालं. त्याच्या कलागुणांचं चीज झालं. तरीही हे आपले ध्येय नव्हे !  तो अस्वस्थ झाला व अधिकाधिक वेळ प्रयोगशाळेत घालवू लागला. त्याही कॉलेजचा निरोप घेऊन, त्याने एम्समधील वनस्पतीशास्त्र व कृषी रसायनशास्त्र या शाखांसाठी नावाजलेल्या "आयोवा स्टेट" कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला, तोही श्रीमती बड यांच्यामुळे. ज्यांनी त्याचे चित्रकलेचे कसब बघितले होते. तिथेही त्याला निग्रो असल्याचे फळ मिळालेच. पण त्याच्या निस्पृह, निष्पाप कर्मयोगामुळे या निग्रो विद्यार्थ्याने सर्वोच्च मिळू शकणारा कॅप्टनचा हुद्दा मिळवला.

गाण्याची, चित्रकलेची आंतरिक ओढ मधूनच त्याला अस्वस्थ करी. चित्रकलेचं किंवा संगीताचा शिक्षण पुढे पूर्ण करावं. असा त्याला सल्ला मिळाल्यावर तो उत्तरला की, कृषीशास्त्राचा अभ्यासाचा उपयोगच माझ्या बांधवांना होईल. त्याच्या चित्रांचे प्रदर्शन हीसुद्धा एक अलौकिक घटना आहे. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला कोट घेऊन दिला होता व सर्व खर्च पण उचलला होता. तो कुणाच्याही दयेवर न जगणारा होता, त्याबदल्यात तो त्या व्यक्तीचं काहीही काम करुन देत असे. "त्यांनी तो कोट आजन्म घातला. पुन्हा पुन्हा दुरुस्त करून." एकदा एका महाशयांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी एक नवा कोट जबरदस्तीने घालून दिला, तेव्हा त्या कोटमध्ये ते काहीच बोलू शकले नाही व ते तिथून निघून गेले.
आपल्या पूर्वायुष्यात लावून घेतलेल्या काही सवयीमुळे जॉर्ज इतर मुलांहून वेगळा पडे. इतर पुस्तकातुन ज्ञान मिळवायचे, पण त्याहीपेक्षा कितीतरी अधिक ज्ञान प्रत्यक्ष निसर्गातून तो मिळवत असे. त्यामुळेच तो अभ्यासात इतरांच्या कितीतरी पुढे असे. कसलंही नाजूक सुंदर फूल त्याच्या कोटावर नेहमी विराजमान झालेलं असे.
आईच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या जॉर्जचे आयुष्य सौ. मिलहॉलंड, सौ. लिस्टन, श्री. बड, मारियाआत्या, मार्टिन, श्री. विल्सन, श्रीमती बड या व्यक्तिमत्त्वांनी संस्कारीत केलं होतं.

आयोवा स्टेटमध्ये प्रा. वॉलेस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन सुरू केलं. मायकॉलॉजी कवकशास्त्र अभ्यासासाठी त्याने वनस्पतींचे 20000 नमुने गोळा केले. बागबागायती, अळिंबीची वाढ या विषयांवर व्याख्याने दिली. वनस्पतींवरील संभाव्य रोग व प्रतिबंधक उपाय याची जाणीव शेतकऱ्यांना करून दिली. या त्याच्या ज्ञानाचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ लागला. त्यानंतर त्याने Agricultural and Bacterial Botany या विषयाची उच्च पदवी  M.S. संपादन केली.

इ.स. 1865 अमेरिकेतील निग्रोंच्या स्वातंत्र्याला मान्यता मिळाली. गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित केलं. डॉ. वॉशिंग्टन हेही कार्व्हर यांच्यासारखे ध्येयाने झपाटलेले. 2000 वस्तीच छोटं खेडं "टस्कीगी". इथे 4 जुलै 1881 रोजी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी ज्ञानदीप प्रज्वलित केला. एक मोडकं, गळकं, जुनाट चर्च आणि 30 काळे विद्यार्थी 14 ते 60 या वयोगटातील हे झालं शाळेचे प्राथमिक स्वरूप. नुकत्याच मिळालेला स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यावा? अज्ञानाचं ओझं झुगारून साधं, सरळ सहज जीवन कसं जगावं?  यासाठीचं शिक्षण. त्यासाठी सुतारकाम, कुंभारकाम, गाद्या तयार करणे, चपला शिवणे इत्यादी कामात विद्यार्थ्यांना तयार केलं. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाजलेल्या विटा यांतून वॉशिंग्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वास्तू उभारली. या प्रविण्यामुळेच त्यांना मागणी येऊ लागली.  "टस्कीगी" शाळेची शिक्षण पद्धती मूलगामी होती. शारीरिक स्वच्छता, स्नान कसं करावं, दात कसे घासावे, कपडे कसे धुवावेत, कसे वापरावेत या विषयांचे शिक्षण मुलांना दिले जाई. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात आला. दिवसभरात एकूण 17 घंटा होत निरनिराळ्या कामांसाठी. विद्यार्थी उराशी एक स्वप्न घेऊन बाहेर पडे:  "मी ही एक अशीच शाळा उभारिन!" पंधरा वर्षात परिसरात अशा चाळीस इमारती उभ्या राहिल्या. त्याही विद्यार्थ्यांच्या विटांनी बनलेल्या. या कामासाठी त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट देऊन गौरव केला. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे देऊ लागले व संस्थेसाठी निधी जमवू लागले.

गुलामांच्या व्यापारावर दक्षिण अमेरिकेत प्रचंड "कापूस साम्राज्य" पोसलं होतं. गुलामांना जंगलतोड करायला लावून, जंगलाला आग लावली जाई. त्यात उरलीसुरली वनसंपत्तीही स्वाहा होई. त्यामुळे जमिनीचा वरचाच सुपीक थर धुऊन गेला व नैसर्गिक खाद्य समुद्राच्या पोटात वाहून गेलं आणि म्हणून कृत्रिम खतांचा वापर सुरू झाला. दक्षिण अमेरिकेला वाचवण्यासाठी आता डॉक्टर वॉशिंग्टन यांनी कार्व्हर यांना पत्र लिहिलं, मी तुम्हाला पैसा, उच्चपद, किर्तीचं आमिष दाखवत नाही. ते तुमच्याकडे आहे. त्याच्या बदल्यात मी तुमच्यावर काम, अविरत कष्ट आणि शतकानुशतकं दारिद्र्याने गांजलेल्या, गुलामीच्या चिखलात रुतलेल्या, दलितांना सुधारुन, त्यांना "सुजान मानव" बनवण्याची कामगिरी सोपवत आहे. "मी येत आहे!" असे उत्तरात तीनच शब्द लिहून ते पत्र कार्व्हर यांनी वॉशिंग्टन यांना पाठवलं. कार्व्हर यांना खूप आनंद झाला होता. आणि हुशार, तल्लख जॉर्ज आपल्या बांधवांची सेवा करायला निघाला... आपल्या कर्मभूमीत !

ओसाड, निकृष्ट, मृतवत जमीन, लाल पिवळ्या जांभळ्या रंगाची रेताड जमीन. कुठे गवताचं पानही नजरेस पडेना, हिरव्या रंगाचा मागमूस नाही. जॉर्ज यांचे ज्ञान, बुद्धी याचा कस लागणार, यासाठीच त्यांचा या वंशात जन्म झाला असावा !

जॉर्ज कार्व्हर हे आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत की, "जो निसर्गाच्या प्रेमात पडून त्याच्याशी जवळीक साधतो त्याच्याशीच निसर्ग गुजगोष्टी करतो."

आजवर कोणीच केला नसेल, असा उपक्रम त्यांनी हाती घेतला. गावात फिरून प्रत्येक अंगणात, परसात, टाकून दिलेला भंगारमाल, फुटकी भांडी कुंडी, दिवट्या- चिमण्या, बाटल्या, डबे, अगदी जे मिळेल ते, जमा करायचं आणि प्रयोगशाळा उभारायची, उपकरणे जमवायची. केवळ महागडी व अत्याधुनिक साधनं वापरून यश मिळवता येतं असं नाही, असे ते म्हणत. त्यांनी कुदळीने जमीन कसली. मातीवर प्रयोग केले. जमिनीत केरकचरा, शेण, सांडपाण्याचा चिखल, पालापाचोळा पसरवला. पुन्हा नांगरट झाली. प्राध्यापकांनी चवळी पेरली, म्हणून लोकांनी त्यांना मुर्खात काढलं. चवळीच का? तर हवेतून नत्रवायू जमिनीला पुरवला गेला, पुढच्या पिकासाठी. त्यानंतर भुईमूग पेरून फॉस्फेट व पोटॅश ही जमिनीला पुरवले गेले. दक्षिण अमेरिकेत भुईमूग हे "डुकरापुढचं खाणं" मानलं जात असे. चवळी पासून पाककृती बनवून विद्यार्थ्यांच्या ताटात सुग्रास अन्न वाढलं. त्यानंतर रताळी लावली, दसपटीने पीक आलं. जमिनीचा कस वाढविण्यासाठी रासायनिक खतांची गरज कशाला ? स्वयंपाक घरातील पालेभाज्यांची देठे, फळांची साल, उष्ट खरकटं, सारं घालून "सेंद्रिय खत" निर्मिती करण्यात आली. रताळ्या नंतर "कपास" लावली. रसरशीत आणि भरघोस पीक पाहण्यासाठी पंचक्रोशी लोटली. विक्रमी पीक आलं. पिक वरांवार बदलली की, जमिनीची प्रत सुधारते.

उभी हयात कपाशीची लागवड करण्यात घालवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा ही कितीतरी पटींनी अधिक पैदास उभ्या जन्मात कपास न पाहिलेल्या उत्तरेकडच्या एका "शाळा मास्तराने" करून दाखवली. त्यामुळे शेतकरीही कार्व्हर यांचा सल्ला घेऊ लागले. मग शेतकरी संघटना निर्माण झाल्या. निग्रो मुलांनी विटा, भांडी, चपला, गाद्या, खराटे, बग्या, गाड्या, घरं, झाडू, कापड, कपडे, एवढंच काय !  स्वतःच्या हातांनी भव्य वास्तु उभारली. बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शने भरवली जाऊ लागली. कृषी विभागाचा व्याप वाढला. फंड कमी पडू लागला तेव्हा, डॉक्टर कार्व्हर यांनी वाद्यवृंद तयार करून ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले.

जीवनसत्त्वांच्या अभावामुळे "पेलाग्रा" स्कर्व्ही" या रोगांनी बहुजन समाज पछाडला गेला, त्यांची कातडी भेगाळली. जशी जमीन भेगाळते तशी ! मग त्यांच्या 1899 साली "फिरत्या कृषी विद्यालयाने" जन्म घेतला. "टोमॅटो" हे विषारी फळ नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी टोमॅटो खाऊन दाखवलं. निकृष्ट जमिनीतून भरगच्च, रसरशीत पीक कसं येतं, याचं संशोधन करून दाखवलं. बटाटे, कोबी, कांदे, कलिंगड यांची बियाणे पुरवली. "रताळे" या पिकाची लागवड केली. त्याची पान, देठं खाऊन डुकरे पोसली. दक्षिणेतील लोकांच्या आहाराच्या सवयी बदलल्या. बाल संवर्धन, पशु संगोपन, कुक्कुटपालन इत्यादी विषयांचे ही प्रबोधन केले. मातीपासून रंग बनवून घरं रंगवायला शिकवली.

"जमिनीवरची मालकी" ही भावना, गरीब शेतकऱ्यांना सुखवू लागली. पुंजी जमवली तर वर्षाअखेरीस तीन एकर जमीन विकत घेता येते. हे त्यांनी आपल्या बांधवांना दाखवून दिले. डॉ. कार्व्हर यांच्या भगीरथ प्रयत्नाने दक्षिणी शेतकर्‍याच्या अंगणात गंगा अवतरली. ज्ञानाची गंगा. समृद्धीची गंगा. "त्यांच्या अखंड समाजसेवेत बाधा येऊ नये म्हणून ते अविवाहित राहिले. तशी त्यांच्या आयुष्यात एक संधी आली होती. "कुमारी हंट" अर्थविभागात शिक्षिका होत्या. त्यांच्याविषयी प्राध्यापक मनात आंतरिक ओढ होती. समाज सेवेपुढे संसारात लक्ष घालणं त्यांना जमलं नसतं, म्हणून त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. त्याही शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या. एवढं सोडलं, तर त्यांचं खाजगी आयुष्य नव्हतंच."

त्यांच्या फिरत्या शाळेतला हातभार लावणारा त्यांचा विद्यार्थी "थॉमस कॅम्बल" हा शेवटपर्यंत कार्व्हर यांच्या सोबत होता. त्याने कार्व्हर यांची कीर्ती जगासमोर आणली.

डॉ.कार्व्हर यांच्या सांगण्याप्रमाणे कापसाच्या जोखडातून निघण्यासाठी भुईमुग लावला. भरघोस उत्पन्न निघालं. पण बाजारपेठ नाही. प्रयोगशाळेत भुईमुगावर प्रयोग केले. या "केमर्जीने" पृथक्करण, विघटन, संयोग करून वेगवेगळ्या 300 वस्तू बनवल्या. उदाहरणार्थ चरबी, रेझीन, साखर, शाई, बूटपॉलिश रंग, दाढीचा साबण, खत, गुळगुळीत कागद, कृत्रिम फरश्या, ग्रीस, लोणी, प्लास्टिक, दूध, सौंदर्यप्रसाधन, शाम्पू, विनेगर, झटपट कॉफी, पर्यायी क्वीनाईन, लाकडासाठी रंग, केसातील कोंडा नाहीसा करणारं औषध, खाद्यतेल, कृत्रिम संगमरवरी फरशा इ.

याच प्रमाणे त्यांनी रताळ्यावर सुद्धा खूप सारे प्रयोग केले व पहिल्या महायुद्धाच्या काळात अन्न तुटवड्याचं संकट टाळलं. त्यावेळेस मात्र डॉ. वॉशिंग्टन हयात नव्हते.


या संशोधनामुळे नवे पर्व सुरू झाले होते. त्या व्याख्यान देण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्यांच्या हातातील जड व विशिष्ट बांधणीच्या सामनामुळे लोक त्यांना ओळखू लागले.


"विचारी माणसाचं तोंड नेहमी बंद असतं", हे त्यांचं आवडतं सुभाषित. त्यांचा कल बोलण्यापेक्षा बघण्याकडे अधिक ! त्यांची "विद्यार्थिदशा" कधी सरलीच नाही. कोणतीही वस्तू "कचरा" न मानणं हा त्यांचा स्वभाव गुण. या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारं जपा. वेळ प्रसंगी त्याचा उपयोग होतो, असं ते नेहमी बजावत.  सामाजिक बंधनांनी या ज्ञानदेवाला बाहेरच्या जगात मिसळू दिले नाही. त्यामुळे ते अधिक एकलकोंडे झाले. आपण बरे ! आपले कार्य बरे ! कदाचित, नाहीतर ते ध्येयापासून विचलित ही झाले असते.

आपल्या बुद्धीच्या जोरावर संपत्ती आणि कीर्तीला पायाशी लोळण घ्यायला लावण्याचे सामर्थ्य असूनही, स्वतःला वेगळ्या कार्याला वाहून घेतलं. ऐहिक सुखाकडे पाठ फिरवली. दलित बांधवांना "सुजाण मानव" बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. त्यासाठी ते खपले! गुलाम आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला, स्वकर्तृत्वाने थोर बनलेला आणि तस्कीगी शाळेत स्वखुशीने शिक्षकी पेशा पत्करणारा निग्रो संशोधक देशाच्या ही अडचणी सोडवी. त्यांच्या समाजसेवेच्या व्रतामुळे त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव 'डॉक्टरेट' पदवी बहाल करून "डॉक्टर ऑफ सायन्स" असा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी लोकांनी त्यांना डॉक्टर म्हणण्यास सुरुवात केली होती. कारण ती प्रत्येक प्रश्नाचे उत्तर डॉक्टरप्रमाणे शोधून काढी.

महात्मा गांधीजींशीही पत्रव्यवहार झाला होता. पौष्टीक आहार सांगितला होता. भारतातील अर्धपोटी जनतेसाठी अन्नघटकांची गरज भागवू शकणाऱ्या वनस्पती हिंदुस्थानात सहजासहजी उपलब्ध होत्या.

जेव्हा अवघं जग पहाटेच्या साखरझोपेत असे, तेव्हा प्रा. कार्व्हर निसर्गदेवतेच्या सानिध्यात असे. सृष्टीचे रहस्य शोधण्यात मग्न असत.आल्यावर प्रयोगशाळेत संशोधन सुरू होई. 1932 चा पोलिओच्या भयानक साथीत ही संपूर्ण अमेरिकेत डॉ.कार्व्हर यांच्याकडून उपचार घेतले गेले.

डॉ. कार्व्हर यांच्या तंत्रशुद्ध पद्धतीनुसार लागवड केल्याने अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन झालं होतं. ते वाया जाऊ नये म्हणून "अन्नधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती" त्यांनी शेतकऱ्यांना शिकवल्या. अवजड शास्त्रीय भाषा व उपकरणे न वापरता अगदी "वाळवा", "सुकवा", "उन्ह लावा" अशी बोलीभाषा वापरली. अनेक प्रकारची फळे व भाज्या पिकवल्या जाऊ लागल्या. "पदार्थ दीर्घकाळ सुस्थिस्तीत टिकवण्याचे उपाय", सोप्या "पौस्टीक पाककृती" यांची पत्रकं काढली. "रताळ्यानी" लोकांची व सैनिकांची उपासमार टाळली. "निर्जलीकरण प्रकल्प" उभारला गेला. "भुईमुगाच्या टरफलापासून जमीन भुसभुशीत बनवणार खत तयार केलं गेलं. तर फळांमुळे जमिनीला सेंद्रिय खत मिळालं. तिची प्रत सुधारली. नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश हे जमिनीला मिळू लागलं. शेवटी शेवटी कार्व्हर यांना जगासमोर आणण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. चित्रपट निर्मिती केली गेली. धावपळ वाढली. जे त्यांना नको होतं. त्यांना एकांत हवा होता.

त्यांना कशाचीच आस नव्हती. एका परमेश्वरा शिवाय कोणाची बांधीलकी नव्हती. एका भूमी खेरीज कोणाशीच जवळीक नव्हती. अखंड पोरकेपणाने सावलीसारखी सोबत केली होती. स्वतः चं "काहीच" नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता पंचतत्त्वात विलीन झाला होता. टस्कीगीत त्यांनी 5 जानेवारी 1943 ला अखेरचा श्वास घेतला.

जगाने एक तपस्वी साधुपुरुष गमावला !

प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवं असं पुस्तक "एक होता कार्व्हर !" मला कार्व्हर समजला तो लेखिकेच्या सूत्रबद्ध मांडणीमुळे !

अमेरिकेची खूप सेवा केलीस ! आमच्याही देशात जन्माला ये ! अशी अपेक्षा लेखिका वीणा गवाणकर करत आहे. अन्यथा आमचाही मुलुख ओसाड होईल...

खूपच तोकडं ! पण आपल्यासाठी सारांश रूपाने केलेलं समीक्षण


- आशा चिने

तेरा | चार | दोन हजार वीस


3 comments:

  1. पुस्तक खूप छान आहे आणि कार्व्हर यांचं आयुष्य भारावून टाकणार आहे. तुम्ही लेख खूप छान लिहिला आहे, मी पुस्तक वाचल्यावर माझ्याही याच भावना होत्या.

    ReplyDelete
  2. खुप छान आणि सुंदर पद्धतीने हा लेख लिहिला आहे

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर आणि परिणामकारक लेख. शाळेशाळेत आणि गावागावात ही माहिती पोहोचायला हवी. थोडक्या पण सोप्या शब्दात एवढे मोठे मांडण्याची आपली हातोटी उत्तम आहे .

    ReplyDelete

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect