व्यथा अशीही ! एक स्व-अनुभव...
सर्वांनी वेळ काढून जरूर वाचा...
दररोजच्या वेळेपेक्षा आज जरा लवकरच शाळेत गेले. कारणही तसंच होतं. "चंपाषष्टी" निमित्त "मनेगावची यात्रा" असते. यात्रेला दुसऱ्या दिवशी जास्त गर्दी होते. आणि या यात्रेला आमचा सर्व बालचमू जाणार होता. सर्वच यात्रेला जाणार म्हटल्यावर मला खूप चिंता वाटली मग शाळेचं काय ? आणि म्हणूनच मी लवकरच शाळेत गेले होते.
शाळेत पोचल्यावर मला एक चित्र शाळेमध्ये बघायला मिळालं. शाळेत खूप गर्दी दिसली.
शाळेला कंपाऊंड भिंत नसल्याने शाळेचे मैदान एरवी गावातील लोकांसाठी हवं ते करण्याचं मनमोकळं ठिकाण.
मला अगोदर भीतीच वाटली ! कदाचित एखाद्या अधिकाऱ्याने शाळेला अचानक भेट दिली तर नसावी न ! शाळेच्या गेटमधून आत शिरताच गर्दी अचानक विस्फारू लागली. मला समजेना की, "काय झालं ?" गाडीवर असल्यामुळे मी एकदमच जिथं काहीतरी चालू होतं, त्या ठिकाणी येऊन पोहोचले. बघते तर काय ! काहीतरी दगडांचा खेळ चालू होता. हा खेळ या गावामध्ये दिवसभर चालू असतो. हा खेळ खेळण्यासाठी विद्यार्थीसुद्धा गैरहजर राहतात.
मी जोरजोरात शाळेची घंटा वाजवली. त्यानंतर एक तास झाला तरी कोणीच आलं नाही. आता काय करायचं ? चंपाषष्ठी बद्दलच्या या प्रकाराची मॅडमने मला आदल्या दिवशी पुसटशी कल्पना दिली होती, की विद्यार्थी संख्या कमीच राहिल. हे नव्हतं सांगीतलं की एकही विद्यार्थी राहणार नाही ! शेवटी स्वतःचा अनुभव तो स्वतःचाच असतो ! आता शाळेमध्ये एकमेव मीच होते. या परिस्थितीत काय करायचं ? या विचारांनी डोक्यात तांडव सुरू केले.
स्वतःच्याच मनात थोडीशी गुरफटले. आता पर्याय फक्त गृहभेटीचा. मग काय ! वर्ग लावला आणि वैयक्तिक प्रभातफेरीसाठी निघाले गावात ! हाच दगडांचा खेळ आवार भिंतीच्या बाजूलाच चालू होता. मी त्याच दिशेने होऊन प्रत्येकाच्या घरी गृहभेटी साठी गेले. मी घरी येत आहे अशी वार्ता विद्यार्थ्यांना समजताच प्रत्येक विद्यार्थी लपून बसला. अन् घरचे "आम्हाला यात्रेला जायचं आहे", असं सांगत होते. मी पालकांना विनवणी करू लागले की, तुम्हाला जेव्हा यात्रेला जायचं आहे तेव्हा जा ! तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा. "ठीक आहे", असं पालक म्हणू लागले. ऐकून थोडसं बरं वाटत होतं. मनातून अतिशय राग येत असून सुद्धा स्वतःच्या शब्दांची धार कमी करत प्रत्येकाला हात जोडत होते, विनवणी करत होते, की "विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा". एक-दोन विद्यार्थ्यांनी शाळेचे कपडे घातलेले बघून थोडं हायसं वाटलं !
आज यात्रेला जाण्यासाठी बहुतेक सर्वच पालकवर्ग घरीच होता. अंगणात हात पाय जोडून बसलेले पालक, विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी तयार होत नव्हते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावून नेत आहे, हे पालक स्वतः बघत होते. तरीही, त्यांच्या चेहऱ्यावरचा अविर्भाव हे सांगत होता की, जणू शिक्षकांनाच गरज आहे ! आपला पाल्य शिक्षकांना बघुन लपत आहे, शाळेची तयारी करत नाही, असे असून सुद्धा पालक तोंडातून "ब्र" ही काढत नव्हते. फक्त 'बघ्यांची' भूमिका घेत होते. आता तुम्हीच विचार करा की, "माझ्या मनातलं विचारांचं वादळ कितीच भयानक असेल ते !"
मी एक ना एक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, विनवणी करून सात ते आठ विद्यार्थ्यांना फक्त शाळेत हजर करण्यात यशस्वी झाले. हे सर्व इथेच संपत नाही ! या सात आठ विद्यार्थ्यांना दिवसभर टिकवणं म्हणजे तारेवरची कसरत ठरली ! कारण दिवसभर येणारे जाणारे पाहुणे आणि यात्रेला जाणारे लोक, यामुळे विद्यार्थी सतत आपल्याला कसं घरी जाता येईल ? हे बघत होते.
अचानक झालेल्या या संकटात मीही संधी शोधण्याचा प्रयत्न करत होते. आज विद्यार्थी संख्या कमी असल्याने मला प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यास वेळ भेटला. हजर असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सखोल अभ्यास घेण्यात मी यशस्वी ठरले आणि आज एक वेगळाच आनंद मला मिळाला. ज्याप्रमाणे लढाई यशस्वी केल्यानंतर जिंकल्याचा आनंद मिळतो तसा आनंद आज ह्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा पहायला मिळत होता.
ज्याप्रमाणे कुटुंब सांभाळताना कर्त्या व्यक्तीची फरफट होते, त्याप्रमाणे स्वतःची फरफट होताना आज जवळून पाहिली. विद्यार्थ्यांना खिळवून ठेवण्यासाठी आज दिवसभर खाऊ वाटत होते. सतत अभ्यासात बदल करून आवडीचा अभ्यास देत होते. त्यामुळे मुलंही मोकळे होऊन प्रश्न विचारत होते, समजून घेत होते.
आज या प्रसंगाच्या निमित्ताने खूप साऱ्या नवीन प्रश्नांचा जन्म झाला आहे. शिक्षक कसा असावा? त्याचं व्यक्तिमत्त्व कसं असावं? हे प्रत्येक शिक्षकाने पुस्तकात वाचलेलं आहे ! पण तो नेमका कसा असावा? हे फक्त तिथली परिस्थितीच ठरू शकते ! त्याला सर्वगुणसंपन्न, अष्टपैलू ही तिथली परिस्थितीच बनवते ! आहात का सहमत ?
क्रमशः....
लेखिका: आशा ज्ञानदेव चिने
प्राथमिक शिक्षिका,
जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर, नाशिक
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा...
Blog: ashachine.blogspot.in