#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Tuesday 16 April 2019

खेळाचे साहित्य


आज आनंदी आनंद झाला..!
😃🤩⚽🏏⛹🏼🤸‍♂🎯











          " मी तुम्हाला खेळाचे साहित्य आणून देईल !" असं मी सहज विद्यार्थ्यांना बोलले होते आणि ती गरजही होती ! बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे ना ! "नव्हे ! त्याचा फार जवळचा संबंध आहे." आणि मैदानी खेळ कोणाला नाही आवडत ? यात प्राणी सुद्धा कमी नाही. मग आपण तर मनुष्य आहोत. आणि यामुळे तर विद्यार्थ्यांत संघभावना, खिलाडूवृत्ती, चपळता, संवेदनशीलता, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, स्री - पुरुष समानता, अशा एक ना अनेक गुणांचा परिपोष होतो. चार भिंती बाहेरचं शिक्षण म्हणतो ना ! अगदी तसं. संस्कार करायला काय विद्यार्थ्याला घेऊन बसायचं नसतं. वर्गातील आणि वर्गाबाहेरील कृतीच त्याचं सर्वांगीण शिक्षण करतात. 

         आमचा बालचमू तर दररोजच..! 'मॅडम' आणलं का खेळाचे साहित्य ? म्हणून विचारून भंडावून सोडत असे. पण मी ठरवलं होतं परीक्षा झाल्याशिवाय साहित्य आणायचं नाही. मुलांना वाटलं की आता शाळेला सुट्ट्या लागणार..! मॅडम साहित्य आणणार नाही. अन् माझंही वेळेअभावी मागे पुढे चालू होतं.

           तो दिवस आज उगवला. Cricket kit, फुटबॉल, दोऱ्या, रिंग असं बालचमूला आवडणारं सर्व साहित्य घेऊन शाळेत गेले. गाडीला लटकलेलं साहित्य मुलांनी बघितलं नि काय ! विना वाऱ्याचीच बातमी गावभर पसरली.. ज्यांना शाळेत यायला पाया पडावं लागायचं ते अंघोळ करून धावत-पळतच शाळेकडे सुटले. आणि चेहऱ्यावर न थांबणार हास्य फुललं. जसे, सध्या उन्हाळ्यात पावसाळा सुरू आहे न अगदी तसं. 

        आज तुम्ही, या चमूला कोणताही गड सर करायला सांगा; सहज करतील. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून क्षणभर मी साहित्य आणायला उशीर का केला ? आणि अजूनही उशीर झाला असता तर मी या सुखाला मुकले तर नसते ना ! याचाच विचार मनात घोळू लागला.

        नव्या साहित्यासोबत एक दोन फोटो काढले, मग काय? झाली साहित्याची चाचपणी सुरू. कित्ती कौतुकाने न्याहळणी चालली होती ! मुलांनी क्रिकेट किट आणि फुटबॉलचं आरक्षण करून टाकलं. मुलींच्या हाती रिंग आणि दोऱ्या लागल्या होत्या. साहित्य हातात मिळताच श्रीगणेशा झाला. सगळ्या मैदानात धूम ! लागलीच आम्हीही मैदानात उतरलोच. खरंतर, आज खूप दिवसांनी खेळायला मिळालं होतं. पुन्हा बालपण जगून घेतलं. आणि कधीतरी आपणही मैदान गाजवत असल्याचं आठवलं. या विद्यार्थ्यांत मी भविष्यातील खेळाडू बघतेय. हे विद्यार्थी खोखो, कबड्डी अतिशय उत्कृष्टपणे खेळतात. प्रत्येक खेळ खेळण्यात हे बालचमू तरबेज आहेत. भविष्यातील सर्व संधी त्यांना मिळो.

         गंमत म्हणजे विद्यार्थ्यांनी ही आम्हाला सूचना केली, उद्यापण शाळा भरवा ! सुट्टी देऊ नका...... ! आणि आता जर म्हटलं ना ! एक तास अभ्यास करू; मग खेळू; मग बघा ... लगेच म्हणतील, शाळा कधी सोडणार मॅडम ? खेळण्यासाठी अभ्यास करतीलही, पण कसा? 'जसं, आपण फोटोसाठी पोझ देतो ना ; तशी अभ्यासासाठी पोझ देऊन !'

       एरव्ही गावात कायम गल्ली-क्रिकेट खेळणाऱ्या त्या सगळ्या क्रिकेटपटूंना मी भिंतीआडून शाळेतला क्रिकेट बघताना पाहिले. असो..! "सगळीकडे शाळांना सुट्ट्या लागल्यात, आमच्याकडे मात्र शाळा भरल्याचं चित्र रंगलय ! आणि या चित्रातील रंग आणखी गडद होवोत, अशीच कामना करते! "😊💐

- धन्यवाद...🙏🏻
शब्दांकन - *आशा चिने*, गुरेवाडी.
दि. १६/०४/२०१९

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect