निर्भया, कोपर्डी, हिंगणवाडीच्या घटनेने संवेदनशील मने मृत पावल्यासारखी झालीत. आपण सुरक्षित नाहीच ! या विचाराने आजची महिला गलितत्राण पावल्यासारखी दिसतेय.
का आपण माणूस म्हणून जगू शकत नाही?
का आपल्यातील हव्यासाच्या भावना इतक्या खालच्या स्तरावर गेल्यात?
दुसर्याची आई, बहीण, मुलगी तर जाऊ द्या ! पण, तुम्हाला तुमच्यातील माणूस सुद्धा दिसत नाही?
दहा तोंडाच्या रावणाला आपण नाव ठेवतो, पण एक तोंडाचा माणूस एवढा क्रूर कसा झाला?
काही दिवसांपासून जीव घुसमटल्यासारखा झालाय. खूप व्यक्त व्हावंसं वाटतं, पण निःशब्द झालेय... माझ्या भावना या पंक्ती रूपाने आपल्यासमोर मांडत आहे...!😔
अश्रू..!
पंखांत माझ्या बळ देऊन,
पंख कोणी छाटले ?
नभात त्या दाणे पेरून,
स्वप्न माझे हिरावले !😔
पाठीराखा होतास तू !
अन् पाठीत खंजर खुपसले ?
सबला होतेस मी तरी,
बल तू दाखविले!
पारतंत्र्याचे दिवस गेले,
स्वातंत्र्य कुठं मिळाले ?
तेव्हाही मीच ? आणि
आजही मलाच सती दिले !
तू वंशाचा दिवा होतास,
मी पण पणती जाहले !
आयुष्य हरले मी ! अन्
जीवन माझे तू हिसकावले !
लेक तुझी ! बहीण तुझी !
मी पण सर्वस्व जाहले ?
नैतिकता मेली तुझी !
अन् चटके आईनेही सोसले !
रात्रीच्या त्या एकांतात,
कली किती अवतरले ?
देह माझा छिन्न करून,
मनही विच्छिन्न केले !
हास्याच्या खोट्या पडद्याआड,
कसले प्रेम दाखवले ?
शांत मला करून तू ,
सगळे चव्हाट्यावर मांडले !😔
आईबापाच्या डोळ्यांतील,
आभाळ कसे फाटले ?
श्वास होतेस मी त्यांचा,
अन् त्यालाच तू तोडले !
जगायचं होतं खूप मला !
आयुष्य हे कसे संपले ?
वासनांध तू ? अन्
मला का जाळीले ?
कोणता तो गुन्हा? अन्
पाप काय मी केले ?
फासावरती तू हवास ,
अन् जगातून मी गेले !
अबोल कळी तू पुन्हा खुडशील,
व्याकुळ किती मी जाहले ?
वेदना जाण तू माझ्या,
आता अश्रूही माझे गोठले !
....- आशा चिने
बारा/दोन/वीस