#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Saturday, 11 April 2020

ही वाट एकटीची... कादंबरी _ व. पू. काळे

माझं पुस्तक परीक्षण

ही वाट एकटीची 

... कादंबरी. 
_ व. पू. काळे


... केव्हाही पुस्तक वाचायला घेतलं की, अलगद डोळ्यांच्या पापण्यांनी नकार द्यावा अन् पुस्तक स्वप्नातच वाचावं अशी मी. पण आज भिरभिरणाऱ्या मनाला दावणीला बांधावं, तशी ही कादंबरी हातात पडली अन् लागलीच तिला एका बैठकीत वाचून संपवली देखील. 
     



व. पु. काळे या सुंदर मन व विचारांच्या साहित्यिकाची ही अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली, महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी.


जीवन विषयक एक कठोर तत्वज्ञान परखडपणानं "बाबी" या नायिकेच्या माध्यमातून मांडणारी ही कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. तुम्हीही तो घ्यायलाच हवा.

या कादंबरीची सुरुवात होते ती, "बाबीला शेखरला भेटायला जायचं असतं", तिथून. "बाबी" म्हणजे 'विद्युलता फडके'. कादंबरीतील मला भावलेलं पात्र अन् आपल्यातही एक बाबी आहे, याची जाणीव करून देणारी ही कथा. वाचताना जेवढी ह्या समाजाविषयी चीड वाढते, तेवढेच मन मात्र बाबीच्या बाजूने अलगद जाऊन उभे राहते. शेखर जोगळेकर हा दाजीसाहेबांचा मुलगा. दाजीसाहेबांच्या कंपनीत समाजप्रिय नाना म्हणजे बाबीचे वडील काम करत असतात. तिची आई दुर्गाबाई, नावात मात्र अगदी विरोधाभास.आणि बाबीचा भाऊ शरद, बाबीविषयी ज्याच्या मनात अजिबात चांगली भावना नसते, म्हणजे बाबी व शरद अगदी दोन विरुद्ध मतांची भावंडं.

कोणत्याही परिस्थितीत सत्याची कास धरणारी आणि परखड अशी "बाबी" तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना घडत असताना, लेखकाची उत्कंठा वाढवत नेणारी अशी मांडणी, खरंच वाचकाला ही त्याचीच गोष्ट आहे, असे वाटते. बाबी जेव्हा भावनिक जगते, तेव्हा तिला सगळा समाज व्यवहारिक जगायला शिकवत असतो. आणि जेव्हा बाबी या व्यवहाराला समजते, तेव्हा शेखर मात्र तिला भावनिक व्हायला सांगतो. असे असताना भावना आणि व्यवहार जगताना मात्र किती गुंतागुंत वाढवतात? हे आपणही समजून घ्यायला हवं. ज्या समाजाचा आपण एक भाग आहोत, त्या समाजाची बंधनं आपल्याला जगण्यापासून परावृत्त करतात आणि जेव्हा आपण बंधनं झुगारतो, तेव्हा समाजच पुन्हा आपल्याकडे येऊन आपल्याला स्वतः त सामावून घेतो. इथे आपल्याला "बाबी चं" उदाहरण हेच सांगतं, की एकदा तुम्ही या समाजाची बंधन झुगारून तर बघा ! या सगळ्यात आठले सर व अक्काची भूमिका बाबी च्या आयुष्यात खरा प्रकाश टाकते.

बाबी आणि शेखर यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाने बाबी मात्र सुरुवातीपासून  एकटीच राहते. हा तिच्या भावनांचा प्रवास या कादंबरीत अतिशय ओघवता मांडला आहे. 

आज मलाही वाटत आहे की मी बाबी जगत आहे. आज पुन्हा एकदा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला हे नक्की.

 तुम्ही वाचली का ही कादंबरी?
तुमच्या यादीतील वाचनीय पुस्तके खाली जोडा, कमेंट करा.

पुस्तक परीक्षण ... आशा चिने

अकरा | चार | दोन हजार वीस

लागणारा वेळ 05:30 तास 

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect