#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Wednesday, 24 February 2016

औषधी वनस्पती

औषधी वनस्पती

पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत.
1.    कडूनिंब
हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहेरील भागाचा काढाही ब-याच आजारांवर उपायकारक ठरतो. या झाडाची लागवड करणं आणि त्याची काळजी घेणं हे आपल्या फायद्याचं आहे.
कडूनिंब तेल असे तयार करावे
कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते.
बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.
2.    तुळस
तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान पण गुण महान’ असे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.
याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, रक्ती मूळव्याध, इत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूध, किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते 30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावं.
सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे –
एक कप तुळशीची पानं पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कप, इतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.
3.    कोरफड (कुमारी)
या वनस्पतीचा उपयोग जखमेवरची मलमपट्टी म्हणून छान होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापा. जखम धुऊन घ्या. तुकडयाची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. ब-याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताचे आजार, स्त्रियांचे आजार आणि खोकला यावर हे खूप गुणकारी आहे.
आपण कोरफड आपल्या बागेत लावू या आणि लोकांनाही लावायला सांगू या. कोरफड कणखर असते आणि वर्षानुवर्षे वाढते व टिकते .
4.    अडुळसा
या झुडुपाचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. 50-60 अडुळशाची पाने स्वच्छ धुऊन, ती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे. हा काढा गार करून गाळून ठेवावा. खोकला झाल्यास 20 मि.लि. काढा दिवसातून 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.
5.    कुडा
हे जंगलात सापडणारं झाड आहे. त्याची शेंगेसारखी फळं पिकल्यावर काळी होतात ही फळे जोडीने लटकलेली असतात. म्हणून ती मध्ये जोडलेल्या दोन शेवग्याच्या शेंगांसारखी दिसतात. या झाडाच्या खोडाचे साल औषधी असते. जुलाब आणि आव यासाठी ते वापरतात. खोडाच्या सालाचा एक तुकडा कुटून त्यात एक चमचा मध मिसळून औषध तयार केले जाते.
कुडयाचा काढादेखील करतात. सोळा कप पाण्यामध्ये सालाचे एक कप कूट घालून मिश्रण चार कप होईपर्यंत उकळा. गार करून बाटलीत भरून ठेवा. एका माणसाला एका वेळी 20 मि.लि. काढा, दिवसातून तीनदा द्यावा.

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect