#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Tuesday 9 October 2018

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर १


     ३१ मे २०१८ चा तो दिवस. बदली झाली अन् नवीन शाळा गुरेवाडी येथे रुजू होण्यासाठी सिन्नर मध्ये प्रथमच पाऊल ठेवलं. शाळा हायवेवरच असल्याने तशी एक उत्सुकता शिगेला पोहोचलेली. हायवेने जातानाच रस्त्याच्या दुतर्फा झाडे जणू हात पसरून स्वागतच करत होते. पोटातले अन्न शाळेत गेल्यावरच पचण्याच्या प्रतीक्षेत, रस्ताही तसा सुंदरच. कारण माझ्या अगोदरच्या शाळेत रस्त्याचा मोठा संघर्ष मी केलेला होता. पालकांच्या शेतातून कधी बांधानेच शाळेत जावे लागे. कधी शेतकऱ्याने शेत नांगरल्याने उतरून हातानेच गाडी लोटणे. पावसाळ्यात तर विचारूच नका. चिखल अन् पाणी. पावसाळ्यातलं जितकं छान दृश्य ! तितकाच मनस्ताप! कित्येक वेळा अपघात अन् दुखापत. पण या सर्वांच्या पलिकडे एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी, माझी जीव की प्राण असणारी शाळा तळेवस्ती. रस्त्याच्या बाबतीत म्हणाल तर प्रचंड अवघड शाळा. 
      बदलीच्या शाळेत रस्त्याचा त्रास तेवढा नसावा एवढीच माफक अपेक्षा! बदलीच्या शाळेत नक्कीच काहीतरी वेगळे व नाविन्यपूर्ण मिळेल अशी आशा घेऊनच आले होते. तालुका माझाच तरी आपल्याच तालुक्यात कसं परकं वाटत होतं. नवे ठिकाण, नवा तालुका, नवी शाळा, नवे विद्यार्थी, नवा शालेय परिसर, नवे अधिकारी व सहकारी शिक्षक, नवं घर ! नव्या गोष्टींचा केवढा आनंद असतो. नवीन संकल्पना, नवे उपक्रम, नवा उद्देश, एक छानसं नवं स्वप्न घेऊनच आले होते. शाळेसमोर उभी राहून शाळा कुठे आहे? असं विचारणं म्हणजे केवढा मोठा गहन प्रश्न. अन् ह्या सर्व नव्या कल्पना नजरेसमोरच मावळताना पाहिल्या. 
        शाळा अन् परिसर पाहून पायाखालची जमीनच सरकली. होत्याचं नव्हतं झाल्यासारखं वाटलं. नको नको त्या विचारांचं काहूर डोक्यात माजलं. एक आदर्श शाळा, विद्यार्थी, शिक्षक अन् जिवापाड प्रेम करणारे पालक या सर्वांना सोडून आल्याची जणू शिक्षाच मिळाली! काय सोडलं अन् कुठे आले हे समजण्याच्या पलिकडच्या गोष्टी होऊन बसल्या. गावाकडे बदली झाल्याचा आनंद पार विरून गेला. कुठूनतरी चक्रे फिरावी अन् परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी व्हावी अशी खोटी समजूत मनाला घालत होते, पण व्यर्थ! का हे देवाचंच नियोजन म्हणायचं ? स्वतःतील झोकून काम करण्याची वृत्ती, उपक्रमशीलता, नाविन्यता ह्या सर्व बाबी कशा फिक्या वाटू लागल्या. परिस्थितीला दोन हात करणारी मी पण पुरती गलितगात्र झाले. एकदम जुनी, रंगाचं कुठेही नाव नसलेली शाळा इमारत, निरस वातावरण, परिसर, शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या गावातील अबालवृद्ध क्रिकेटपटूंचा आमच्या तोंडाकडे एकटक बघणारा तो चमू अन् मे ची ती रखरखणारी दुपार भयानकतेत भर टाकत होती. 
       शाळेची आवार भिंत एकेकाळी शाळेचा वारसा जपत होती, पण तीच लोखंडी भिंत एक एक तार काढून दररोज दुपारी येणाऱ्या भंगार वाल्याच्या केव्हा स्वाधीन झाली हेही लक्षात आलं नसावं. या सगळ्यांची साक्ष देणारी निशाणी तेवढी बाकी राहिली ती अर्धवट भिंत. ती भिंत आता एका कट्ट्याच्या रूपात गावातील मंडळींना केव्हाही बसण्याचं हक्काचं ठिकाण बनलं. शाळेच्या इमारतीकडे तोंड करून बसायचं आणि शाळेत काय काय चालतंय याची गंमत बघायची.
        एकीकडे ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालेला असताना हे गाव मात्र त्या गावचंच नव्हतं. ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालेला असताना शिक्षणाची पाळेमुळे खोलवर रुजण्यासाठी ओलावा निर्माण झालाच नसेल का? तो ओलावा वरवरचा होता. की अंकुरण्याच्या आधीच पीक करपत होतं. जिथं एका नजरेत एवढी गांजलेली परिस्थिती काळजाचा ठोका चुकवत होती तिथं आतल्या परिस्थितीचा विचारही तितकाच भयावह होता. अंगातल्या त्राणाने केव्हाच मान टाकली होती. अन् अा वासून उभ्या असणाऱ्या या मळकट परिस्थितीने आजाराचा दरवाजाही केव्हाच उघडला होता.
      रुजू झाले अन् उन्हाळी सुट्टीचे १५ दिवस अजुन आपल्याकडे आहेत. या आविर्भावात सुट्टी आनंदात घालवण्याचा खोटा प्रयत्न करू लागले. सुट्टीही जरा लवकरच संपली. शाळेच्या आदल्या दिवशी शाळेत पोहोचले. स्वच्छता करायची पण कुठून अन् कशी. कारण समस्यांमधील मुख्य समस्या म्हणजे अस्वच्छता. दारू, तंबाखू, गुटखा, गांजा, जुगार व्यसनांचीच चलतीच होती गावात. आणि त्यासाठी एकमेव सार्वजनिक ठिकाण म्हणजे शाळा. रात्र अन् सुट्टी शाळेतच. तिथेच खा - प्या, तिथेच कचरा टाका अन् थुंका. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस म्हणजे अविस्मरणीय क्षणच झाला म्हणा न. ह्या सर्व परिस्थितीला कुठेही जबाबदार नसताना जर ऐकावं लागलं तर विचार करा ! मी आता काय पाऊल उचलावं? स्वतःला शांत ठेवत खोटा आव आणत स्वतःला गुरेवाडीच्या खोट्या साच्यात घालण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. 
        मशाल फेरी काढायची होती. कोणताही उपक्रम राबवताना सर्व फक्त स्वतःच्या मनाप्रमाणेच व्हायला हवं, अशी आग्रही असणारी मी पण मला कशातच रस वाटेना. हो ला हो अन् नाही ला नाही करत होते. मनाच्या एका कोपऱ्यात विचारांचं चाललेलं प्रचंड तांडव बाहेरचा आवाज अस्पष्ट करत होतं. तहान कसली? नी भूक कसली? काहीच नको. फक्त हा काळ थोडा मागे ढकला, ही चक्रे फिरवा. असा निरर्थक विचार तेव्हढा जोर धरत होता. संध्याकाळी मशाल फेरी काढण्यासाठी यावं लागेल. अधिकारी व गावकरीही हजर असणार म्हणून जबाबदारी उचलत जड मानेनेच होकार देत स्वप्नातल्या या चित्रात रंग भरू लागले. आम्ही शाळेत हजर होताच एक - एक करत मजुरीहून परतलेली मंडळी, क्रिकेट खेळून दमलेला तो चमू, पत्ते झोडून रिफ्रेश झालेली रिकामटेकडी मंडळी, सगळी हळू हळू शाळेत जमली. नव्या शिक्षिकेला बघण्याची इच्छा की अगोदरचे शिक्षक का नाही आले? हा त्यांना पडलेला प्रश्न. त्यांना आनंद झाला की नाही? याचं सध्या मला तरी काहीही घेणं नाही असा विचार डोक्यात न डोकावला तर नवलच. पण ही मंडळीही आपल्या हालचालीतून आपली जणू ओळखच करून देत होती. पुढे होऊन उगीच मदत करणं, सोबत आहोत असं दाखवणं, पुढे - पुढे येणं, हा कसला संकेत म्हणायचा? पण मदत करताहेत तर भविष्यातही करतीलच ! याची चिन्हे म्हणायची का? लग्नाच्या वरातीतला ढोल काय ताल धरेल? असा ताल धरत शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी ढोल वाजवला. अन् क्षणार्धात कार्यक्रमच कसला आहे? याचेही विस्मरण झाले. मी तर वरातीत शिरल्याचाच भास मला झाला. वातावरण पूर्णच बदललं. 
        मशालफेरीने गावाकडे मोर्चा वळवला. वाजत - गाजत अंधारात मशालीचा पडणारा उजेड गुरेवाडीतील ' प्रगतीच्या प्रकाशवाटे' चीच साक्ष जणू देत होता. त्या किर्र अंधाराला चिरत जणू ही मशाल एका परिवर्तनशील गुरेवाडीचा उषःकाल भासत होती. एक प्रकाशकिरण गुरेवाडीत या निमित्ताने पडला होता. अज्ञानाचा अंधकार जणू धुऊन गेला होता. ....
क्रमशः...
लेखिका: आशा ज्ञानदेव चिने
प्राथमिक शिक्षिका
जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी 
ता. सिन्नर, नाशिक
Blog: प्रगतीच्या प्रकाशवाटा

आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा... 

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect