क्रमशः .....
मशालफेरीचा कार्यक्रम छान पार पडला अन् सर्वांच्याच आठवणीतला तो '१५ जून ' शाळेचा पहिला दिवस अखेर उगवला. आमच्या गुरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका 'पद्मा मॅडम'. त्यांनी "टेंशन घेऊ नका, करू आपण हळू हळू!" असं म्हणत मला खूप धीर दिला. तरी माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह काही माझी साथ काय सोडायला तयार होईना! शैक्षणिक सूर्यमालेतील तो सर्वांत मोठा दिवस, सकाळी ७.०० ते सायंकाळ ५.०० वाजेपर्यंत. स्वच्छता करताना साधारण दोन तीन गोण्या गुटखा, तंबाखू व तत्सम रॅपर, दारूच्या बाटल्या अन् झाकणं गावात किती "व्यसनं" आहेत याची साक्ष देत होते. जेव्हा साफसफाई चालू होती, तेव्हा गाव जणू ताठ मानेने बघत होता, जणू काय युध्दात विजय मिळवलाय! त्यांना कदाचित मी सफाई कामगार तर वाटले नसेल ना!
शाळा प्रवेशोत्सव, प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत, गणवेश - पाठ्यपुस्तक वाटप, काही सक्तीचे अन् अनासक्तीचे उपक्रम. दरवर्षीप्रमाणे याही शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली. माझ्या अंगवळणी पडलेल्या काही उपक्रमांची चलती इथेही रूप घेत होती. आपण जेही करू ते सर्वांसाठी नवीनच असेल, म्हणून ते कितपत पचनी पडेल? असा दबका सुर कामात थंडपणा आणत होता. मला सर्वच नवीन असल्याने कोणाला किती मान द्यावा? ह्याच्या नादात मान हलवून हलवून दुखू लागली. चेहऱ्यावर एक स्माईल दिवसभर टिकवताना स्माईल केव्हा गालाला चिकटून गेली कळलेच नाही.
बाहेरच्या परिसरात भिरभिरणाऱ्या माझ्या नजरा आता आतला परिसर (म्हणजे वर्ग) पाहण्यासाठी उत्सुकल्या होत्या. परिसरात नजरेचे थैमान चालू असतानाच पाऊले आता वर्गाकडे कूच करत होती. अन् ती वर्गात किती वेळ अडखळणार ? अडखळणार की नाही? असे विचार मनात टाकीचे घाव घालत होते. तळेवस्तीच्या विद्यार्थ्यांचे चेहरे नेहमीच नजरेसमोर ठेऊन खूप सारे दिव्य केले होते. बरेचसे प्रयोग सिध्दीस नेले होते. का कुणास ठाऊक ? गुरेवाडीच्या विद्यार्थ्यांत तसा एक तरी चेहरा दिसावा म्हणून मन उगीच स्वतःला धीर देत होते. मी स्वतःहून विद्यार्थ्यांशी सलगी करताना ते मात्र अंतराने (अदबीने) वागत. त्यामुळे परकेपणाची जाणीव जोर धरत होती.
वर्गात पाऊल ठेवताच मनाच्या गाभाऱ्यात गर्द झालेल्या काळोखाने आता विचित्र सावटाचे रूप घेतले होते. इतक्या वेळापासून उत्कंठा शिगेला असतानाच समस्यारुपी ड्रॅगन समोर उभा ठाकला. हा आपल्याला जणू गिळंकृत करेल की काय? असा तीव्र आवाज घणाणू लागला. क्षणार्धात मला पुढे काय वाढून ठेवले आहे याची स्पष्ट कल्पना आली. अन् समोर "आ" वासून उभ्या असणाऱ्या समस्यांनी जणू मला घेरले. एक विशिष्ट वास (कारण विद्यार्थ्यांनी आंघोळ केल्या नव्हत्या), आवाज, विद्यार्थ्यांचे राहणीमान, वर्गातल्या त्या कोऱ्या, बेरंग भिंती अन् कोपरे माझ्याकडे एकटक बघत असल्यागत भासत होते. शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली शासनाची अध्ययन समृद्धीची भाषा - गणितची पेटी फक्त. माझ्या वर्गात टेबल व खुर्ची असावी अशी माझी माफक इच्छा होती, झोका खाणारा टेबल का होईना! पण माझी ती इच्छा पूर्ण झाली. तळेवस्तीला असताना मी नेहमी विद्यार्थ्यांच्या छोट्या बेंचवरच बसले, कारण वर्गात टेबल नव्हताच! खुर्ची पकडण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी हितगुजलाच मी प्राधान्य दिले. पद्मा मॅडमही मधून मधून मला विद्यार्थ्यांविषयी, तिथल्या परिस्थितीविषयी मार्गदर्शन करत होत्या.
विद्यार्थी काहीतरी बोलतीलच! अशा आविर्भावात मी असतानाच पुरता हिरमुड! ती काहीच बोलली नाहीत. "कदाचित बदल रुचत नसावा." माझी ओळख करून देत, मी त्यांचीही ओळख करून घेत होते. विद्यार्थ्यांची सुंदर सुंदर नावे ऐकून मीही संभ्रमात पडले होते, पालक तर अडाणी मग नावे एवढी सुंदर कशी? छान वाटलं ऐकून. पण कपाळ! एक नाव लक्षात राहिल म्हणून. अन् लगेच आठवलं की तळेवस्तीचे बरेचसे 'नामकरण विधी' मी नाव दाखल करतानाच पार पाडले होते.
अस्वच्छता नावाचा भला मोठा ड्रॅगन गुरेवाडीत वास्तव्यास होता. त्याने आपला डंख न मारला तर नवलच. अंगावर मळकट कपडे अन् आंघोळ न केल्याने वातावरणात विचित्र अशांतता. काय कारण आहे? विचारूनही समाधान होईना. उत्तरात फक्त विशिष्ट प्रकारे हसणं, लाजणं. काय समजू ह्याला? समोर घडणाऱ्या साऱ्या परिस्थितीने माझं हळू हळू वादळात रूपांतर होऊ लागलं. मी टाकलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नवीन प्रश्न! अंगाचा तिळपापड होऊ लागला. समोरच्या परिस्थितीने, वातावरणाने "माझ्यातील मी" पुरती हादरले. तळेवस्तीत परिपाठाचा नित्यक्रम होता. छंदच म्हणा न! ह्या नित्यक्रमाला पुरता तडा गेला. काही वेगळं करताना एका अनामिक भीतीने स्वतःला सावरत होते.
जेवणाच्या सुट्टीत छानसा श्लोक होईल अन् मग जेवणे, अशी अपेक्षा. पण कसलं काय! "अरे, भात खायला शाळा सुटलीsss ! असं म्हणत अख्खा चमू घराकडे पळाला. येताना हातात एक डबा घेऊन आले. अन् डबा कोणता? आई बापाने मजुरीला नेलेला असा एक डबा ज्यातला एक डबा, कडी अन् झाकण हरवलंय. मग उरलेला डबा म्हणजे ह्या चमूंची प्लेट. हात न धुताच चप्पल सहित बसले मांडी घालून. कोणी ओरडतंय, कोणी शिव्या देतंय! अन् आणखी बरंच काही. चला माझ्यामागे श्लोक म्हणा! मी असं म्हटलं तर आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले. हसू लागले. गावाचं तर विचारूच नका. न सुटणारं कोडंच! कदाचित मला वेडी म्हणायला पण कमी केले नसेल!
गाणी, गप्पा, गोष्टी घेत मी विद्यार्थ्यांत मिसळण्याचा प्रयत्न करत होते. मनातून पण खोलवर हादरले होते. आणि विद्यार्थी , शाळा हा आवडीचा विषय असूनही घड्याळात किती वाजले बघत होते. दिवस काढत होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच माझ्या सदसद् विवेकबुध्दीने बदली अन् स्वेच्छा निवृत्तीचा विचार केला नसेल तर नवलच?
आपली नाव दूरवर दिसणाऱ्या तटापर्यंत नेण्यासाठी सागराच्या गर्तेतील खोली, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करून उत्तम नावाडी बनायचं स्वप्न तग धरेल की नाही? हे उगवणारी "प्रगतीची प्रकाशवाट"च ठरवणार होती.
क्रमशः...
लेखिका: आशा ज्ञानदेव चिने
प्राथमिक शिक्षिका
जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी
ता. सिन्नर, नाशिक
....आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!