#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

ज्ञानरचनावाद

                ज्ञानरचनावाद....


            शिक्षकांसाठी मूल्य-शिक्षण शिक्षण


             गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्ते ‘आमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतो’ असे अभिमानाने म्हणताना दिसतात तर ‘रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेत’ असे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजण ‘वर्तनवाद’ विरुद्ध ‘रचनावाद’ अशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्‍याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्‍यांंशी चर्चा करून रचनावादाची पुरेशी सखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे.




                  रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून या विषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणे गरजेचे आहे.


कोरी पाटी सिद्धांत

               ‘मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू’ (याचेच दुसरे रूप म्हणजे ‘मूल म्हणजे मातीचा गोळा’) असा सिद्धांत अनेक वर्षे रूढ होता. अजूनही त्याचे पडसाद कुठे क़ुठे ऐकायला मिळतातच. बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या ‘रिकाम्या’ मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येक मुलाला ‘आपल्याला हवे ते, हवे तसे, हवे तेव्हा’ शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाच शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्‍या पाट्या असत्या तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही !


            वर्तनवादाचा सिद्धांत - स्वरूप आणि मर्यादा

            मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे राहिले. तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. आजही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत विस्ताराने अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्या अस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. बारकाईने बघितले तर आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्या आधारे बांधतो. (उदाहरणार्थ, नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण ‘तो तोंड पाडून बसलाय’ ‘बोलत नाहीये’ असे त्याचे वर्तन पाहून बांधतो! कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.) त्यामुळे मग ‘वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. या व्याख्येच्या शास्त्रीय असण्याचा दबदबा इतका होता की मानसिक अवस्था वा प्रक्रियांबद्दल बोलणे अशास्त्रीय गणले जाऊ लागले. वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग ‘मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणे’ अशी आपल्याला सुपरिचित असलेली शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली. वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिल स्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले.


               मूल मातृभाषा (खरे तर परिसर भाषा म्हणायला हवे !) कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला. माणसाची भाषा ही एक अत्यंत गुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे. जगातल्या खर्‍या वस्तू, क्रिया, भावना, वस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनी आपण दाखवत असतो. भाषेतील शब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करू शकतो. मातृभाषेचे नियम, व्याकरण, जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकते, भाषा वापरून आपण विचार कसा करू शकतो, याचे उत्तर वर्तनवादी सिद्धांताला देता येईना.


            आकलनवाद

              वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असत. कारण विचार-प्रक्रिया अभ्यासायची तर मनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवात झाली होती! या प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेले. ‘मूल भाषा कशी शिकते, हे केवळ अभिसंधान प्रक्रिया वापरून स्पष्ट करणे अशक्य आहे’ अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केली. माणसाची विचारप्रक्रिया म्हणजे वर्तन नाही, तर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतो. विचार- प्रक्रिया ही मानसिक पातळीवर चालणारी क्रिया असल्याने, आकलनवादासोबत मानसिक-अवस्था व मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासात परत स्थान मिळाले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाही, मात्र तो शिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यास तोकडा आहे, असे सप्रमाण दाखवून दिले आहे.




           ज्ञानरचनावाद

             मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया यांचा अभ्यास करणे मानसशास्त्रात पुन्हा एकदा दाखल झाल्यावर, शिकण्याची प्रक्रिया काय आहे हे उलगडून दाखवण्याला बराच वेग आला. त्यातूनच ज्ञानरचनावादाची कल्पना पुढे आली. मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा (ीलहशार) आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्या ज्ञानाची रचना करत असते असा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल आपल्या ज्ञानाची रचना कशी करते यावर ज्ञानरचनावाद बराच प्रकाश टाकतो. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे , तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपड आहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गती मिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्याने बनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेले उदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.


१. सुरुवातीला ‘बाबा’ या शब्दाचा अर्थ पुरुष या शब्दासारखाच असतो. त्यामुळे सर्व पुरुषांसारख्या दिसणार्‍या व्यक्तींना मूल बाबा म्हणते.


२. हळू हळू त्यातून आजोबा, दादा असे वयानुसार पडणारे काही गट वेगळे होतात. मग त्या त्या वयोगटातील व्यक्तींना मूल दादा वा आजोबा म्हणू लागते. या टप्प्यावर पुरुष या धारणेत किमान आजोबा, बाबा व दादा असे तीन गट आहेत.


३. काका, मामा अशी नाती लक्षात येऊ लागली म्हणजे मुलाची पुरुष या गटाची धारणा अधिक विस्तारते.


४. हळू हळू वाढत्या अनुभवाबरोबर पुरुष या शब्दाची मोठ्या माणसांच्या धारणेसारखी धारणा मूल बनवते.

           मुलाने संकल्पना बांधण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता वर्तनवादी दृष्टिकोनातून वरील घटना पाहायची झाली तर बाबा, दादा, आजोबा या शब्दांचे (खरे तर आवाजांचे) अभिसंधान वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींशी होते व त्यातून मूल हे वेगवेगळे शब्द उच्चारते असे म्हणावे लागेल. पण असे सुटे सुटे शब्द उच्चारणे हे काही मुलाची नात्यांबाबतची समग्र समज दाखवत नाही. मुलाच्या शिकण्याची प्रक्रिया उलगडण्यासाठी वर्तनवाद तोकडा पडतो म्हणजे काय याची या उदाहरणावरून कल्पना यावी.

                महत्त्वाचा मुद्दा असा की ज्ञानरचनावादात मुलांच्या अनुभवाला शिकण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान आहे. समृद्ध अनुभवांखेरीज मुले ज्ञानाची रचना करणार नाहीत असा ज्ञानरचनावादाचा विश्वास आहे. म्हणूनच अनेकदा हाताने करून शिकणे प्रभावी ठरते असा आपला अनुभव आहे. मात्र ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवण्यासाठी नेहमीच काही तरी हाताने करणे गरजेचे आहे हापण एक गैरसमज आहे. किंवा हाताने काहीतरी करायला दिले म्हणजे ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवले असे होत नाही. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन विकसित झाला म्हणजे शिक्षकांच्या शिकवण्यात एक नेमकेपणा येतो, प्रत्येक मुलाची ज्ञानरचनेची प्रक्रिया वेगळी असल्याचे लक्षात आल्याने शिकवण्यात जी लवचीकता येते हे महत्त्वाचे आहे.


              अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्ञानरचनावादातून पुढे येतो. तो म्हणजे मुलांच्या धारणा एकदम बनत नाहीत तर त्या बनतात, मोडतात आणि पुन्हा नव्याने बनतात. त्यामुळे आपण जसे सांगू तसेच्या तसे मूल ग्रहण करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. इयत्ता आठवीत मुलाने तयार केलेली सूर्यमालेसारखी अणूची धारणा (म्हणजे मधे केंद्रक आणि भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन अशी) आणि प्रत्यक्ष अणूची रचना यात मोठेच अंतर आहे. पण म्हणून आपण आठवीच्या मुलाची धारणा चुकीची म्हणत नाही. तर अणूची संकल्पना समजून घेण्यातली ती एक अनिवार्य पायरी मानतो. म्हणजेच ज्ञानरचनावादात मुलांच्या तथाकथित चुकांकडे शिकण्यातली एक पायरी म्हणून बघितले जाते.


              आत्तापर्यंत केलेल्या विवेचनावरून कुणी विचारेल, ‘जर मूल स्वत:च ज्ञानाची रचना करणार असेल तर शिकवणार्‍यांचे काय काम?’ मात्र हा ज्ञानरचनावादाचा विपर्यास होईल. ज्ञानरचनावादात मोठ्यांसोबतच्या आंतरक्रियेलाही महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानरचनावाद ही संकल्पना जशीजशी विकसित होत गेली तसेतसे मोठ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधिकाधिक पुढे आले. भाषा हे महत्त्वाचे साधन बर्‍याच प्रमाणात मोठ्यांशी झालेल्या आंतरक्रियेतूनच मुलांना मिळते. मूल ज्या समाजात वाढते त्या समाजातून मिळालेली भाषा हा मुलांच्या ज्ञानरचनेतील महत्त्वाचा घटक आहे.


            तसेच एखाद्या मुलाची ज्ञानाची सध्याची धारणा लक्षात घेऊन तिथून कोणत्या नव्या धारणेपर्यंत मूल मोठ्यांच्या मदतीने पोहचू शकेल याचा अंदाज शिकवणार्‍याला घ्यावा लागतो.


     ज्ञानरचनावादाचे काही पैलू आपण पाहिले. ते एका दृष्टिक्षेपात पुढीलप्रमाणे मांडता येतील.


१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. या रचनेसाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.


२. ‘हाताने करून शिकणे’ हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.


३. मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगत विचाराला आदराचे स्थान आहे.


४. मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर काय आणि कशी मदत करावी याचे भान शिकवणार्‍या माणसाला असावे लागते.


ज्ञानरचनावाद हा शिकण्याबाबतचा सिद्धांत बराच प्रगत असला तरी तो शिकण्याच्या प्रक्रियेचे समग्र वर्णन करत नाही. शिकण्याच्या इतर सिद्धांतांप्रमाणेच तोही एक आंशिक सिद्धांत आहे. पण मुलांच्या शिकण्याचे बरेच नवे आयाम या सिद्धांतामुळे आपल्यासमोर आले हे खरे. शिकवताना शिक्षकाला अनेक सिद्धांतांचा एकत्र आधार घेऊन शिकवावे लागते. हे वास्तव लक्षात घेता शिकण्याबाबतचे सर्वच सिद्धांत अभ्यासून, पचवून डोळसपणे शिकवता येणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे


1. पिंजर्‍यात बंद असणार्‍या एखाद्या उंदराला ‘कळ दाबल्यावर अन्न मिळते’ हे अपघाताने समजले, तर तो हवे तेव्हा कळ दाबून अन्न मिळवायला शिकतो. कळ दाबणे हे वर्तन अन्नाच्या बक्षिसामुळे उंदीर पुन्हा पुन्हा करतो. काही काळाने जर वारंवार कळ दाबून अन्न मिळाले नाही तर तो कळ दाबणे बंद करतो. कळ दाबणे आणि अन्न मिळणे यात जो संबंध जोडला जातो त्याला अभिसंधान किंवा Conditioning असे म्हणतात.वर्तनवाद्यांच्या मते अभिसंधान ही शिकण्यातील प्रमुख प्रक्रिया आहे.


2. तीन वर्षांच्या आयुषचे हे वाक्य पाहा - ‘इथे झुरळ मरले आहे बघ.’ या क्रियापदाचे ‘मरले’ असे भूतकाळातील रूप केले आहे. अर्थातच त्याच्या आसपासचे कोणीच हे रूप वापरत नाही. सगळेजण ‘झुरळ मेले’ असे रूपच वापरतात. मात्र लहानग्या आयुषच्या मनात मराठीचे व्याकरण आकार घेते आहे, त्यामुळे त्याने बसले, उठले यासारखे मरले असे रूप बनवले आहे. कोणीही कधीही न वापरलेले हे क्रियापदाचे रूप आयुषला कसे सुचले याचे स्पष्टीकरण वर्तनवादी सिद्धांताच्या आधारे देता येत नाही.


3. सहावीच्या वर्गात गुरुजींनी ऋण संख्या शिकवल्या, पूर्णांक संख्यांची बेरीज-वजाबाकी शिकवली आणि मुलांना उदाहरणे सोडवायला दिली. त्यांना असे दिसले की बर्‍याच जणांचा ऋण संख्यांच्या बेरीज-वजाबाकीत तर गोंधळ उडालाच, पण गंमत म्हणजे ४-३ =? यासारख्या उदाहरणातही मुलांनी चुका केल्या होत्या. इयत्ता सहावीत येईपर्यंत सहजपणे येणार्‍या वजाबाकीत मुलांनी का चुका केल्या ? आतापर्यंत नैसर्गिक संख्याच्या आधारे वजाबाकीची जी धारणा मुलांनी बनवली होती ती पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीच्या नियमांमुळे मोडून पडली आणि त्यामुळे आता वजाबाकीची नवीन धारणा बनेपर्यंत मुलांचा स्वाभाविकपणेच गोंधळ झाला. ही नवी धारणा बनेपर्यंत मुलांना वेळ द्यायला हवा असे ज्ञानरचनावादावर विश्वास असणारा शिक्षक़ म्हणेल.


4. उदाहरणार्थ एखादे मूल अपूर्णांक शिकते आहे. अपूर्णांकांची मूलभूत कल्पना (आकृती पाहून अपूर्णांक लिहिणे वगैरे), अपूर्णांकाचे वाचन, लेखन या बाबी त्याला स्वतंत्रपणे येत असल्या तरी दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवायला त्याला लगेच जमेल असे नाही. काही दिवस निरनिराळ्या अपूर्णांकांच्या जोड्यांवर शिक्षकांच्या मदतीने, शैक्षणिक साधने वापरून काम केले म्हणजे मग लहान-मोठेपणा ठरवणे मुलांना शक्य होऊ लागते.

    
ज्ञानरचनावाद🎯

शब्दांचा डोंगर :

         या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम एक शब्द दिला जातो. नंतर त्या शब्दास अनुसरन खालील प्रत्येक ओळीत एकेक शब्द / शब्दसमुह क्रमाने वाढवण्यास सांगणे. यावेळी विद्यार्थ्यांकडून खुप मोठ्या शब्दडोंगराची अपेक्षा करु नका. सुरुवातीला 3 ते 4 ओळींचा झाला तरी चालेल. मात्र हळूहळू तो वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

           उदाहरणार्थ :

                                                 आंबा

                                              आंबा खातो.

                                       रमेश आंबा खातो.

                                 रमेश गोड आंबा खातो.  

                         रमेश  हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.

                   रमेश दररोज हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.

              रमेश दररोज सकाळी हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.



✴ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :


१) व्याकरणाचा भाग सहजतेने घेता येतो.

२) मनोरंजनातून मुले वाक्य तयार करतात.

३)आपण सांगितलेले वाक्य मुले लक्षात ठेवतात.

४)मुलांच्या शब्दसंपत्तीत वाढ हाेते.

५)बाेली भाषेतील अनेक नवीन शब्द परीचित हाेतात.

६) अबाेल व शांत असणारी मुले बाेलतात व आपले विचार मांडतात.

७)अपुर्ण गाेष्ट पुर्ण करणे ..अपुर्ण कविता पुर्ण करणे या काैशल्यांचा नकळत पणे विकास हाेताे.

८) दिलेल्या शब्दांशी सहसंबंध असणारे शब्द शोधण्याची प्रेरणा मुलांना मिळते.

९) मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होतो.


            मला या उपक्रमातुन आलेला अनुभव असा कि ... मी वर्गात "राजू खातो" असे २शब्द दिले. त्यातून मुलांनी वाक्ये सांगायला सुरुवात केली की,

                                    राजू खातो

                               राजू आंबा खातो

                          राजू गोड आंबा खातो

                    राजू गोड आंबा पटकन खातो

             राजू गोड आंबाआवडीने पटकन खातो


          या उदाहरणातून मग मुलांना (इ.३री च्या) मला  कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण, गुणविशेषण, क्रियाविशेषण यांची माहिती देणे सहज सोपे झाले.

     



✳ शब्दचक्र :


         या उपक्रमात मध्यभागी एक छोटे वर्तुळ रेखाटून त्याला वर्तुळाच्या कडेपासून बाहेर जाणाऱ्या ८ रेषा समोरासमोर काढाव्यात. या वर्तुळात कोणतेही एक अक्षर लिहून त्यापासून सुरुवात होणारे शब्द त्या ८ रेषांपुढे लिहिण्यास सांगावे.


✳ या उपक्रमातून साध्य होणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे :


 १)ध्वनिभेद :


            इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम घेऊन त्यांना वर्तुळातील दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द विचारावे. यामुळे मुले त्या अक्षराचा उच्चार होणारेच शब्द सांगतात. चुकून एखाद्या मुलाने दुसऱ्या अक्षरापासून सुरु होणारा शब्द सांगितल्यास त्यांना स्वतःच त्यातील ध्वनिभेद समजतो.


२) शब्दचक्र वाचन :


       इयत्ता २री च्या मुलांसाठी प्रत्येक मुलाला वेगळे अक्षर देऊन त्यापासून त्यांना ८ शब्द असलेले शब्दचक्र तयार करण्यास सांगावे. एकाने दुसऱ्याचे शब्दचक्र वाचावे तर दुसऱ्याने पहिल्याचे शब्दचक्र वाचावे. असे गटात कार्य देऊन वाचन कौशल्याचा विकास घड़वता येतो तसेच शब्द संपत्ति देखील वाढते.


३) शब्दाचा वाक्यात उपयोग :


                इयत्ता ३री व ४थी साठी याच उपक्रमाचा उपयोग करुन तयार झालेल्या ८ शब्दांचा वाक्यात उपयोग करून ८ वाक्य तयार करता येऊ शकतात. यामुळे दिलेल्या शब्दाची वाक्यात कुठे रचना करावी हे विद्यार्थ्याना समजण्यास मदत होते.


४) गोष्ट तयार करणे :


           शब्दचक्रातील ८ शब्दांपासून गोष्ट तयार करण्याचा उपक्रम देखील घेऊ शकतो. तयार झालेल्या कोणत्याही शब्दांत सहसंबंध जोडून गोष्ट विद्यार्थी करू शकतात.


५) शब्दांची करामत :


          हा उपक्रम देखील या शब्दचक्राद्वारे साध्य होऊ शकतो. तयार झालेल्या ८ शब्दांना योग्य "प्रत्यय" लावून शब्द करामतीचे वाक्य तयार होऊ शकते.

उदा. कविताने काकाचे कपड़े कपटात  कोंबले.


६) यमक शब्द संग्रह :


               शब्दचक्राद्वारे तयार झालेल्या ८ शब्दांचे यमक विद्यार्थ्याना विचारावे. यातून विद्यार्थी पूर्वज्ञानावर आधारित बरेच यमक शब्द सांगतात.


                 असे अनेक उपक्रम या एका उपक्रमातून घेऊ शकतो.  लहान तसेच मोठ्या इयत्तेसाठी देखील हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो .


                या उपक्रमाचा आलेला अनुभव असा की एका गटाला एका शब्द चक्राजवळ कार्य दिल्यास विद्यार्थी वरील संपुर्ण ६ प्रकारच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेऊन शब्दचक्र तयार करतात.यामुळे मुलांची क्रियाशिलता व शब्दसंपत्ती वाढण्यास खुपच मदत झाली .

           धन्यवाद!!!


                                               ✴ज्ञानरचनावाद संकल्पना ✴



             ज्ञानरचनावाद  संपूर्णतः विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी निगडित आहे. तसेच बालमानसशास्त्रात याविषयी एक विशेष अधिष्ठान प्राप्त आहे. आपल्याला अभ्यासात अपेक्षित प्रगती विद्यार्थ्याने साधली म्हणजेच ज्ञानरचनावाद पद्धती यशस्वी अन्यथा निकामी असे म्हणणे ही थोडे आगतिकतेशी निगडित ठरेल.

             ज्ञानरचनावादातून विद्यार्थी घडेल हे शाश्वत सत्य आहे, कारण जेव्हा विद्यार्थी स्वत: विचार करायला लागेल तेव्हाच अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल.

            विद्यार्थी स्वत: विचार करण्यास प्रवृत्त होईल अशी अध्ययन अध्यापन प्रणाली आपणांस अपेक्षित होती आणि आज अशा प्रणालीचे आपण पाईक आहोत ही बाब आनंदाची आहे असे मला वाटते.

            विद्यार्थी स्वत: शिकतो हे आपल्याला जे आश्चर्यकारक वाटणारे होते आज कुठेतरी त्यावर आपला विश्वास बसतोय आणि खरोखर आपण त्याची यशस्वी प्रचिती घेत आहोत.

             असे म्हणने वरवरचे ठरेल की ज्ञानरचनावादातून विद्यार्थी फक्त बोलके होतात, उलट मी तर असे म्हणेन की ज्ञानरचनावादातून खरा विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

             विद्यार्थी स्वत: विचार करतो म्हणजे एका नवीन वैश्विक कल्पनेचा जन्म होतोय, काहीतरी नवीन घडेल अशी एक आशा निर्माण होतेय.

         आखून दिलेला अभ्यासक्रम,पाठ्यक्रम हे अंतिम उद्दिष्ट न मानता विद्यार्थ्यांच्या कल्पनेला, कुतूहलाला, चिकित्सेला कुठेतरी व्यासपीठ मिळून देणे म्हणजे खरा ज्ञानरचनावाद.

              निश्चितच फक्त वाचन,लेखन न राहता सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडणे हेच ज्ञानरचनावादाचे उद्दिष्ट आहे यात तिळमात्र शंका नाही.

            सर्वप्रथम आपण रचनावादाची व्याख्या व्यापक स्वरूपात समजून घ्यायला हवी. शाळेतील फरशी रेखाटन तसेच नवनवीन शैक्षणिक साहित्य निर्माण केली म्हणजेच रचनावाद असे म्हणणे ज्ञानरचनावादास संकुचित केल्यासारखे होईल.

         सर्व प्रथम मी तर म्हणेण की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यायला हवेत, त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करायला हवेत.  परिसर भेटींच्या संख्येत वाढ झाली पाहिजे.

          निरीक्षण करण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी फिरली पाहिजेत.

निसर्गाची ओळख झाली पाहिजे तरच ज्ञानरचनावाद यशस्वी होईल.




✳ गणित आगगाड़ी :


         या उपक्रमात एका कार्ड चे रेख आखून दोन भाग करावेत. अशी एकूण ५ ते ६ कार्ड तयार करावीत. पहिल्या कार्ड च्या डाव्या भागात "स्टार्ट" असे लिहावे किंवा गणिताला सुरुवात केल्याचे चिन्ह काढावे ➡ व उजव्या बाजूला गणित लिहावे.

          आगगाडी हा मुलांचा लहानपणापासुनचा आवडीचा विषय तीच आवड या ठिकाणी उपयोगात आणुन गणिताच्या क्रियांमध्ये तर्कसंगत विचार करून दिल्येल्या कार्ड मधुन एका गणिताचे उत्तर शोधल्या नंतर दुसरे गणित मिळते, पुन्हा त्याच्या उत्तराचा शोध घेतल्यानंतरही पुढील गणित ..अशा प्रकारे एक गंमत गाडी तयार होते. जोपर्यंत  हे चिन्ह मिळत नाही किंवा गणित आगगाड़ी संपल्याचे चिन्ह मिळत नाही, तोपर्यंत ही गंमत गाडी सुरूच राहते.

            गणिताच्या चारही मुलभुत क्रियांसाठी ही गंमत गणित गाडी इयत्ते नुसार वापरता येते. मुले आनंदाने शिकतात एकेका क्रियेचे दृढीकरण होण्यास मदत होते. मिश्र उदा.यामध्ये घेता येतात.



 ✳ या उपक्रमामुळे पुढील उद्दीष्टे साध्य होतात :


१)मुले आनंदाने हसत खेळत  आनंदाने सांख्यिक क्रिया शिकतात.

२) लहान गटासाठी (इ.१ली व २री) बेरीज वजाबाकी या क्रियांचे दृढीकरण होते.

३)मोठ्या गटासाठी गुणाकार व भागाकार या क्रियांचे दृढीकरण होते.

४) तोंडी व पटपट उदा.सोडवण्याची सवय लागते.

५) मुले तर्कसंगत विचार करू लागतात.

६) उत्तर सापडत नसल्यास आपल्या सवंगड्याची मदत घेतात.

            मला या उपक्रमाचा असा फायदा झाला कि माझ्या इयत्ता ३री च्या वर्गातील जी मुले फळ्यावर दिलेली ४ ते ५ उदाहरणे सोडवण्याचा कंटाळा करायची तसेच खुप वेळ लावायची, ती मुले आता अगदी वेगात गणित सोडवतात. ६ डब्यांचि आगगाड़ी संपू नये असे वाटते,


⭕ ज्ञानरचनावाद⭕


⚪"पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद  म्हणतात  "⚪


🔴वैशिष्ट्ये  :--

1 सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .

2 जग आणि  शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते

3 करणे सोपे होत.े

4 माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .

5 ज्ञाननिर्मितीला फायदा होतो.


📕📙 पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात....

1⃣ पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा

2 मधील चित्र दाखवून मुलांचे गट👭👬 करून चर्चा घडवून आणा.

3 चर्चा प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 सांगण्याची संधी दया .

4 चित्रावर आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास 📝 सांगा

5 गटातील मुलाला🙎🙇 माहिती वाचण्यास सांगा

6 आशय स्पष्ट करून सांगा   . चर्चा घडवून आणा .

7 तेथे साहित्याचा💽💻📱📻📚🎶 वापर करा .

8शब्दाचा वाक्यात उपयोग करून घ्या

9 पाठ मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या .

10 कविता साभिनय💃 👯सादर करून घ्या .


↪आपल्या भूमिकेत थोडा बदल करून

👉शिकणे 👈ही क्रिया अधिक मनोरंजक करू या .

आपण कमी बोलून मुलाना बोलते करून त्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दया .


======================


💥.........



1⃣पहील काम... वर्गरचना बदलून रचनावादाप्रमाणे करू या....


2⃣दुसरं काम ....अडगळीत पडलेलं  सगळ शै.साहित्य बाहेर काढु या.


3⃣तिसरं काम....आपल्या परीसरातील टाकाऊ वस्तुपासून शै.साहित्य तयार करू या.


4⃣चौथं काम.. वर्ग शिक्षकांनो वर्गातील  फरशीवर  उपयुक्त शै.चार्ट  व इतर काम करू.



📖 प्रगत / अप्रगत📖


         प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपण पायाभूत चाचणी इ. २ री ते ८ वी साठी घेतली.

          या चाचणी नंतर अप्रगत विदयार्थी संख्या आपण निश्चीत केली.

       शासन निर्णयानूसार आता आपणास या अप्रगत विदयार्थ्यासाठी कृती कार्यक्रम आखुन त्यांना प्रगत मुलांच्या रांगेत नेण्याचे कार्य करायचे आहे.

     कृती कार्यक्रम कोणता ? कसा ? कालावधी किती ? या सर्व बाबीचं स्वातंत्र्य त्या- त्या वर्ग शिक्षकास आहे. किंबहुना तो कृती कार्यक्रम त्यांनीच तयार करावा, हाच चांगला उद्देश यामागे आहे.


    
⚡ विदयार्थी अप्रगत राहण्याची कारणे ⚡

१ - नियमित शाळेत न येणे.


२ - कमी वयातील प्रवेश.


३ - प्रत्येक मुलाची संपादणूक पातळी, अध्ययन क्षमता भिन्न-भिन्न असणे.


४ - न.प / जि. प. शाळांचा पालकवर्ग पाल्यांच्या शै. प्रगती बाबत उदासीन / जागरुकता कमी असणे.


५ - काैटुंबीक, सामाजिक परीसरात शै. वातावरणाची कमतरता.


६ - अध्यापनात शै. साधन, साहीत्याचा कमी वापर.


७ - संदर्भिय पुस्तकांची कमतरता.


८ - मुलांच्या कौटुंबिक समस्या.


९ - अध्यापनातील निरसता.


१० - मुलांची लेखन कौशल्य तुलनेने कमी विकसीत होणे.(तोंडी उत्तरे सांगता येतात, पण लिहीता येत नाही)


११ - शारिरीक समस्या जसे - आजार, चंचलता, अपंगत्व इ.


१२ - पायाभूत चाचणीतील प्रश्नांचे स्वरूप जसे - कल्पना करा यासारखे प्रश्न मुलांना सोडवताना अडचणी आल्या.


१३ - अशैक्षणिक कामाचा अध्यापनावरील परीणाम.


⚡  📖  अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी काही उपाय योजना  📖  ⚡

१ - 📝 पायाभूत चाचणीत न सोडवू शकलेल्या प्रश्नांचा (त्या स्वरुपाच्या) सराव घेणे.


२ -  📻 शै. साहीत्याचा अध्यापनात अधिक वापर.


३ - 📊 प्रत्येक मुलांचे मुल्यमापन वेगवेगळे करुन (निदान लावून) तसा उपचार करणे.


४ - 🎈लहान-लहान, मुलांना आवडतील, त्यांचे संबोध, संकल्पना स्पष्ट होतील असे भाषिक, गणितीय खेळ घेणे.


५ - ✒लेखन कौशल्य अधिक विकसीत करण्याकडे लक्ष देणे.


६ - 👼🏻 कल्पनाशक्तीचा अधिक वापर करण्यासाठी उपक्रम घेणे.


७ - १ ते ९ ची अंक ओळख दृढ करणे.


८ - 1⃣ १ चा पाढा घेणे.


९ - वर्ग सजावटीत मुलांच्या प्रत्यक्ष सहभाग, जसे त्यांनी निर्माण केलेल्या कृतींचा समावेश.


१० - मूलभुत क्षमता विकास.


११ -  स्मरणशक्तींवर आधारित खेळ.


१२ - 💿 शै. व्हिडीओ, तंत्रज्ञान यांचा अध्यापनात वापर.


१३ - पाढे बनविन्यांच्या विविध पध्दतीचा वापर.


१४ - ☝🏻 हवेत बोट फिरवुन अक्षरांचे, अंकाचे, शब्दांचा लेखन सराव घेणे.


१५ - 🚴🏻 खेळाच्या तासात मातीत संख्या, अक्षर, शब्द लेखन घेणे.


१६ - पृथ्वकरण करुन शिकवणे.


१७ - १ ते ४ च्या वर्गासाठी पिरीयड सिस्टीम राबवणे.


१८ - गृहपाठ रंजकतापूर्ण देणे.


१९ - मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवणे.


२० - 👭 मुलांप्रती शिक्षकांचा लगाव.



@ ज्ञानरचनावादामध्ये शालेय मंत्रिमंडळाचे स्थान @

🌞 रचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शिक्षक - विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण खुपच व्यस्त आहे. आपल्या अनेक वाड्या - वस्त्यांमधील शिक्षकांना 3-4   वर्ग सांभाळत प्रशासनाचा गाडि हाकावा लागतो. अशा वेळी "विद्यार्थी संसद / शाळा मंत्रीमंडळ " महत्त्वाची भूमिका बजावते. याचे काही प्रातिनिधीक फायदे पाहूयात.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

         @   रचनावादी उपक्रमासाठी वेळेचे नियोजन   @


                ज्ञानरचनावाद शाळेत अंमलात आणताना आपणास खुप अडचणी येतात. सर्वात मुख्य अडचण म्हणजे वेळेची! आपण रचनावादासाठी इतर साहित्य, उपक्रम नियोजन यात गुंतून जातो व मुलांना रचनावादी बनविण्यासाठी वेळ कमी पडतो. सोबत हे सर्व उपक्रम आपल्या पाठ्यक्रमाचा भाग नसल्याने आपणास पाठ्यक्रमही पुर्ण करण्याची कसरत करावी लागते. त्यातच जर शाळेमध्ये विविध माहितीचे टप्पे किंवा अहवाल आले कि मग आपण पुरते हताश होतो. व यामूळे कधी - कधी आपला भ्रमनिराश पण होतो.

         यावर उपाय म्हणून व आपणास विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात "शाळा मंत्रीमंडळ" खुप उपयोगी येते.


✨: 🐣 मुलांच्या कल्पकतेला वाव 🐣


            मी बरेच वेळी असे पाहिले आहे की "ज्ञानरचनावाद" म्हटले की शिक्षक स्वतःच्या कल्पक बुध्दीला ताण देऊन विविध रेडीमेड उपक्रम मुलांसमोर ठेवतात व मुले ते पुर्ण करण्यात गुंतून जातात!

       मात्र यात मुलांच्या सृजनशिलतेला आव्हान देणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम विद्यार्थ्यांनीच स्वतः तयार करावेत नव्हे त्यांनीच पुढाकार घेऊन राबवावेत अशी अपेक्षा असते. व शिक्षक यात केवळ एका निरीक्षकाची भूमिका बजावतात! आणि यासाठी "शाळा मंत्रिमंडळ" एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते.


🐬 मुलांच्या सुप्त गुणांचा विकासासाठी सर्वोत्तम 🐬


मुलांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी आपण वेगवेगळे स्वतंत्र उपक्रम राबवतो. परंतु "शाळा मंत्रिमंडळ" हे यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यातून खालील गुणांचा विकास होतो.


1. निर्णय क्षमता

2. सहकार्याची भावना

3. पुढाकार घेऊन कार्य करणे.

4. जबाबदारीची जाणीव

5. 'स्व' चा विकास

6. नेतृत्व गुण

7. कार्यक्रम नियोजन

8. वक्तृत्व कौशल्य

9. परस्पर सहसंबंध

10. दुसऱ्याच्या मताचा आदर

इ.


☀ इतर उपक्रमांची सहजतेने अंमलबजावणी ☀


             आपण जे दैनंदिन उपक्रम राबवतो, त्याची अंमलबजावणी शाळा मंत्रीमंडळावर सोपविल्यास आपणास इतर उपक्रमासाठी व पाठ्यक्रमासाठी वेळ मिळतो.


💧 यासह अनेक फायदे अपणास शाळा मंत्रीमंडळ करुन देते. फक्त त्याचे नियोजन व अंमलबजावणी व्यवस्थित करावी लागते


@अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम@


 🍁१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.

🍁२)शब्दभेंड्या खेळ घेणे.

🍁३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.


✏लेखनाचे उपक्रम


✒१)धुळपाटीवर लेखन

✒२)हवेत अक्षर गिरविणे.

✒३)समान अक्षर जोड्या लावणे.

✒४)अक्षर आगगाडी बनवणे.

✒५)पाहुणा अक्षर ओळखणे.

✒६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.

✒७)बाराखडीवाचन करणे.

✒८)बाराखडीतक्तेवाचन करणे.

✒९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.

✒१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.

✒११)कथालेखन करणे.

✒१२)कवितालेखन करणे.

✒१३)चिठठीलेखन करणे.

✒१४)संवादलेखन करणे.

✒१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.


🔃गणित


🍀१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे

🍀२)वर्गातील वस्तु मोजणे

🍀३)अवयव मोजणे

🍀४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे

🍀५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.

🍀६)आगगाडी तयार करणे

🍀७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.

🍀८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.

🍀९)अंकाची गोष्ट सांगणे.

🍀१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.

🍀११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे

🍀१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.

🍀१३)बेरीजगाडी तयार करणे.

🍀१४)अंकांपुढे वस्तु मांडणे

🍀१५)गठ्ठे सुट्टे सांगणे

🍀१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा


               वाचन अधिगम विद्यार्थी, डिस्लेक्सिया, मुखदुर्बल, मतिमंद, वाचादोष, मतिमंद अशा विशेष विद्यार्थ्यांनाही ही पध्दती थोड्याफार फरकाने वापरता येते.

ज्ञानरचनावाद पध्दतीने प्रकट वाचन कसे शिकवावे.


* ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-


1. वाचन पुर्वतयारी

2. अक्षर ओळख

3. स्वरचिन्हे ओळख

4. जोडशब्द ओळख

5. वाक्यवाचन

6. परिच्छेद वाचन

7. आकलन



*वाचन पुर्वतयारी


या टप्प्यात खालील प्रकारे वाचनपुर्व तयारी करुन घ्यावी.


1.नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.


2. साम्यभेदाआधारे चित्रवाचन करणे.


3.परिचीत चित्रांसोबत त्याच्या शब्दकार्डांचे अंदाजे वाचन करणे.


4.वाचनासाठी डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.


5. बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात हे समजणे.


6. शब्दकार्डांचा संबंध चित्राशी व इतर दृश्य वस्तुशी जोडणे, याचा सराव. यासाठी आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम...


1. आपल्या वर्गातील सर्व मुलांच्या नावाचे नामपट्या बनवून घ्या. या नाम पट्या त्यांना हाताळण्यास द्या. उपस्थित विद्यार्थीनी आपापल्या नावाचे टँग भिंतीस लावण्यास सांगणे.सर्व पट्या एकत्रीत करुन त्यामधून स्वतःच्या नावाची नामपट्टी ओळखण्यास सांगणे. नंतर नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या ओळखण्यास सांगणे. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकतात.


2. वर्गातील वस्तुंच्या नामपट्या दोन संचामध्ये तयार करुन घ्या.एक संचातील पट्ट्या वस्तूंना डकवा. दुसऱ्या संचातील पट्ट्या मुलास द्या. तुझ्या पट्टीवर जे नाव लिहिले आहे ती वस्तू शोधण्यास  सांगणे. किंवा एखाद्या वस्तूची नामपट्टी शोधून काढण्यास सांगणे.


3. परिचित चित्रांचा व त्याच्या नामपट्यांचा वापर करुन विविध खेळ घेऊ शकतो.


               -सलग तीन दिवस मुलांना चित्र व त्याखाली शब्दकार्ड लावून वाचन करुन घ्या. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.

           पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.

   

             -चित्रपट्टीच्या खाली इतर चित्रांचे नाव टाका. अशा खुप चित्रपट्या बनवा. आता एक चित्रपट्टी विद्यार्थ्यांस द्या.व त्याखालील नाव वाचून त्याचे चित्र असणारी चित्रपट्टी शोधून त्यासमोर लावा. आता या चित्रपट्टीच्या खालील नावानुसार पुढील चित्र, त्यानंतर त्यापुढील चित्र अशी चित्रांची आगगाडी बनविण्यास सांगा.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

चला ज्ञानरचनावादी होऊया!

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया!!!

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

1 comment:

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect