#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Monday 18 March 2019

सावरूया मनाला

सावरूया मनाला...

         आज घराची साफसफाई केली. अगोदर सर्व जळमटे साफ केली. घराचे कोपरे, आडोसा, अडगळीतील सामान... कसं नीटसं अावरून ठेवलं! वस्तुंवरची धूळ जेव्हा बाजूला गेली तेव्हा ज्याप्रमाणे निरभ्र आकाश असतं अगदी त्याप्रमाणेच घरही निरभ्र वाटू लागलं ! रोजच्याच घराला कसं पुन्हा-पुन्हा बघावसं वाटत होतं.

      रोजच्या धावपळीत घराकडे लक्ष द्यायला जमत नाही पण आठ दिवसांनी का होईना कानाकोपऱ्यातून सफाई आपण करतोच ना ! वेळ काढून अन् अगदी मन लावून !

   जर ...अगदी अशीच ; दर आठ दिवसांनी माणसांच्या पण मनातली साफसफाई करता आली असती तर !

   "माणसांच्या सुद्धा मनातील जळमटे, मनाचे कोपरे, मनाच्या आडोशात दडलेल्या चांगल्या-वाईट घटना, अशाच साफसफाईने जर स्वच्छ करता आल्या असत्या तर !" ... अगदी ; त्या निरभ्र आकाशासारख्या !

       "मग मनाला कसं आवरून ठेवता आलं असतं ना !" त्याला सुद्धा कसं पुन्हा पुन्हा बघावसं वाटलं असतं ! नेहमीच्याच त्या माणसांच्या जागा बदलून त्यात भावनेची ओल निर्माण करता आली असती. प्रेमाच्या रंगीबेरंगी फुलदाणीने मनं कशी सजवता आली असती ! मनाच्या गाभाऱ्यात माणसांची नीट मांडणी करून ठेवता आली असती ; अगदी तशीच... जसं वास्तुशास्त्र, रंगसंगती, सजावट, थोडा पारंपारिक टच सुद्धा दिला असता !

     अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, "मनामध्ये, मनाला पटेल, अशा व्यक्तींचीच आवडीनिवडीनुसार निवड केली असती. मनावरचा मळ आठवड्याला नाही ; तर सेकंदालाच पुसला असता !"

      खरं सांगायचं झालं तर, "अशी साफसफाई आपण करतोच ; पण ती तितकी नीट होत नाही." आणि मग माणसाच्या मनातील स्वैराचाराला आळा घालता येत नाही. खूप सारे शब्दांचे वाभाडे ओढल्यानंतर मात्र मनाची वीण जीर्ण होऊन जाते. मग प्रश्नालाही प्रश्नचिन्ह अन् उत्तरालाही प्रश्नचिन्ह ! अशा वेळेस मात्र थोडा जास्त वेळ देऊन मनाला स्वच्छ ठेऊया.

      कराल ना मग मनाच्या साफसफाईचा विचार !

लेख आवडल्यास पुढे पाठवा.

लेखिका - आशा चिने, सिन्नर

2 comments:

  1. आपल्या आयुष्यात कितीतरी प्रसंग आपल्या मनामध्ये कायमचे घर करून असतात. आपण त्यांचा वेळीच निचरा नाही करत.
    या सगळ्यांमध्ये नकळतपणे आपल्याला एक प्रकारचा त्रास होत असतो. आणि मनावरचा ताण तणावही वाढत असतो. हे कचरा रुपी अनावश्यक विचार काही जणांच्या जीवनात नैराश्य निर्माण करतात. तर अनेकांचा जीवन सर्वस्वीपणे व्यापून टाकतात.
    ही विचारांची जळमटं कशी साफ करायचे याचं सोपे उत्तर आपण स्वतः साठी आवर्जून थोडा वेळ दिला पाहिजे.
    आपल्याला काय हवं काय नको काय फेकून द्यायला हवा हे एकदा स्पष्ट झालं की आयुष्य सुंदर,आनंदी, हलकफुलक होऊन जात.��������

    ReplyDelete
  2. आपल्या आयुष्यात कितीतरी प्रसंग आपल्या मनामध्ये कायमचे घर करून असतात. आपण त्यांचा वेळीच निचरा नाही करत.
    या सगळ्यांमध्ये नकळतपणे आपल्याला एक प्रकारचा त्रास होत असतो. आणि मनावरचा ताण तणावही वाढत असतो. हे कचरा रुपी अनावश्यक विचार काही जणांच्या जीवनात नैराश्य निर्माण करतात. तर अनेकांचा जीवन सर्वस्वीपणे व्यापून टाकतात.
    ही विचारांची जळमटं कशी साफ करायचे याचं सोपे उत्तर आपण स्वतः साठी आवर्जून थोडा वेळ दिला पाहिजे.
    आपल्याला काय हवं काय नको काय फेकून द्यायला हवा हे एकदा स्पष्ट झालं की आयुष्य सुंदर,आनंदी, हलकफुलक होऊन जात.🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect