#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday 30 June 2019

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर ७

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर ७
     
          दि 22/8/2018 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी येथे स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण, 2018 अंतर्गत केंद्रीय पथकाने भेट दिली व स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले.
        ग्राम विकास विभाग व शिक्षण विभाग यासाठी दोन दिवसांपासून कसून कामाला लागला होता. गुरेवाडी शाळा व गावात स्वच्छता विषयक आवश्यक ती कामे व सोई यानिमित्ताने राबविल्या गेल्यात. 
       मी तर म्हणेन अगदी योग्य गावाची निवड झाली. निमित्ताने या गावासाठी अगदी पेचीदा असणारा स्वच्छता हा विषय नाजूक पध्दतीने हाताळला गेला. सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग तहान भूक विसरून काय करता येईल व सर्वेक्षण सकारात्मक पध्दतीने व्हावं यासाठी प्रयत्न करता येईल. 
       गावातील कचरा व त्याची विल्हेवाट, सांडपाणी, स्वच्छतागृह स्वच्छता व बांधणी तसेच त्यासाठी योग्य स्वच्छता साहित्य, वृक्षारोपण, स्वच्छता संदेश व प्रबोधन, शाळा दुरुस्ती व आवश्यक रंगरंगोटी व सजावट, विद्यार्थ्यांची वैकक्तीक स्वच्छता- केस व नखे कापणे या अन् आणखी कित्येक बाबी गुरेवाडी गावात व शाळेत केल्या गेल्या.
   या कामासाठी शिक्षण विभागाचे खंबीर व धाडसी नेतृत्व गटशिक्षणाधिकारी मा. निर्मळ साहेब, विस्तार अधिकारी साळुंखे मॅडम, केंद्रप्रमुख भुजबळ सर, मुसळगाव शाळेचे ठाकरे सर व सर्व शिक्षकवृंद विद्यार्थ्यांसह, गुरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा मॅडम, आणखी इतर शाळांचे काही शिक्षक मला नावे माहीत नाही त्यांनी फलकलेखन केले. हे सर्वजण स्वतः स्वच्छता करत होते. व आजही मुसळगाव शाळेने पथनाट्य, गीत, लेझीम या सर्वांनी गावात व शाळेत वातावरण निर्मिती करून गुरेवाडीची शान वाढविली. या सर्वांना ठाकरे सर, सायाळेकर मॅडम व त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले. 
        ग्रामविकासचे अधिकारी वर्ग अगदी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक संघ, अधिपरिचारिका, आशा वर्कर हे सर्व तसेच सर्व जबाबदार घटक, गुरेवाडी गावातील काही कामसू व्यक्ती हे सर्व गावाचा कायापालट होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत होते.

       खूप आनंद होतोय सांगताना, खरंच गुरेवाडीचं भाग्यच उदयाला आलं. गावाची मी म्हणेन शाळेची  ओळखच बदलली. प्रत्येकाने इथे श्रम ओतले म्हणून त्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा असेल. सर्वच बाबी चांगल्या व्हाव्यात म्हणून निर्मळ साहेबांनी खूप छान मार्गदर्शन व सहकार्य केलं. आवश्यक त्या सूचना केल्या. कार्यक्रम यशस्वी झाला.

तसेच....
सेवाभावी संस्थेची मदत

      एकीकडे झपाट्याने देश बदलत आहे. कोणताही व्यक्ती हाच विचार करतो की मी माझं पाऊल सर्वांच्या पुढं असायला हवं. गुरेवाडीची परिस्थिती मात्र याच्या पूर्णतः विरुद्ध. तालुक्यापासून जेमतेम चार किलोमीटर अंतर, हायवेलगतची शाळा, पण इथले प्रश्न मात्र एकदम गांजलेले. आपणही किमान या जगाच्या बरोबरीने चालायला पाहिजे असा विचार यांच्या मनात डोकावतच नसेलच का? 


       माझं प्रथम ध्येय होतं.. गुरेवाडीतील समस्यारुपी ड्रॅगनला संपवण्याचं. हद्दपार नाही पण त्याला धडा शिकवण्याचं. असं वाटायचं, परिकथेतील परीसारखी जादूची कांडी फिरवावी, अन् सगळी परिस्थिती स्वच्छ करावी, मनाजोगी, हवी तशी. हो ! अगदी बरोबर आहे ; अशा परिस्थितीत फक्त जादूची कांडीच काम करू शकते ! आणि इथे परिकथेतील परी नाही ; तर देवाने परीचं काम माझ्यावरचं सोपवलं होतं. देवाची निवड चुकली नव्हती. आणि आता मलाही तोच मार्ग दाखवणार होता. आणि खरंच तसंच घडलं. परिस्थितीचा अभ्यास झाल्यानंतर मला काय करायचं ? ते उमगलं.


       परिसरात झाडे नसल्याने वातावरणात अगदीच निरस होतं. आवश्यक ते सर्व खड्डे स्वतः खोदून त्यात बिया लागवड केल्या तसेच काही झाडे विकत आणली काही कुंड्यांमध्ये लावली. पण तरीही वातावरण हवं तसं प्रसन्न नव्हतं.


       इथली परिस्थिती बदलायला कोणीही हातभार लावणार नाही हे समजल्यानंतर स्वतःच्या खिशात हात घातला आणि कामास सुरुवात केली. ज्या वातावरणात आपण दिवसभर राहतो ते वातावरण प्रसन्न असेल तर आपणही काम करू शकत नाही. म्हणून बेरंग झालेल्या इमारतीला प्रथम रंग देण्याचे ठरवले. स्वातंत्र्यदिन दोन चार दिवसांवर येऊन ठेपला होता. अधिवेशन काळातल्या सुट्टीमध्ये तीन दिवस शाळेचे अंतरंग व बहिरंग रंगवून टाकले. शाळेच्या दोन वेगवेगळ्या इमारती असल्यामुळे एक इमारत रंगवलेली व न रंगवलेली, त्यामुळे मॅडमने सुद्धा स्वखर्चाने इमारत रंगवून घेतली. शाळा आता मोहक दिसू लागली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रथमच संपूर्ण गाव झेंडावंदन साठी शाळेत हजर झाला बदललेले चित्र पाहून शिक्षकांचे कौतुक करू लागला. शिक्षकांनी स्वखर्चाने इमारती रंगवल्या. परंतु लोकांचा जर लोकसहभाग राहिला असता तर आणखी वेगळे चित्र इथे तयार झाले असते, आव्हान केल्यानंतर काही पालकांनी तुटपुंजा का होईना ! लोकसहभाग जमवायला सुरुवात केली. लोकांची ही शाळेबद्दलची आस्था वाढली. त्यांना प्रथमच शाळा ही आपली असल्याचा आनंद वाटू लागला. 


        बदल घडतोय ! आपणही बदलायला हवे ! आता या भावनेने पालकांच्या मनात जन्म घेतला. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. स्वच्छतेच्या बाबतीत गावकऱ्यांना आवाहन केलं, की शाळा आपली आहे, ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. मग आपण पालक शाळेत येऊन व्हरांड्यात , परिसरात गुटखा तसेच तत्सम पदार्थ खाऊन घाण का करता ? ती सवय तुम्हाला बदलावे लागेल. पालकांनाही ते पटले व हळूहळू त्यात बदल व्हायला सुरुवात झाली. शाळेला आवार भिंत नसल्याने मात्र तेवढा परिणाम बघायला मिळाला नाही. मजूर पालक वर्ग असल्याने रात्री शाळेमध्ये बसण्यासाठी येत असे. त्या गोष्टीला आळा घालणं खूप गरजेचं होतं. 


       शाळेच्या अंतरंग - बाह्यरंग, स्वच्छता यामध्ये महत्वाचा विषय होता विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता. त्यात विद्यार्थ्यांची नखे, कपडे, दात व आंघोळ यांची स्वच्छता. वारंवार सांगून देखील यात मात्र बदल होत नव्हता. पाऊसही वेळेवर नसल्याने पाणीटंचाई आणि त्यामुळेच बरीचशी अस्वच्छता. वातावरणात नैराश्य. स्वच्छतेचे खूप महत्त्व समजून सांगून देखील त्याचा परिणाम होत नव्हता. त्यावर उपाय म्हणून एका बहुउद्देशीय संस्थेची मदत घेतली. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य व स्वच्छता साहित्य उपलब्ध करून घेतले. विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसारच लेखन साहित्य दिले आणि ते साहित्य वर्षभर पुरूनही उरले. स्वच्छता साहित्यामुळे विद्यार्थ्यांना हुरूप आला. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता कशी करायची ? ते समजावून सांगितले. त्यासाठी बक्षिसांचे आयोजन केले. स्वतः विद्यार्थ्यांची आठवड्याला नखे कापून देऊ लागले. सुईदोरा आणून तुटलेले बटण, कपडे शिवून देऊ लागले. आहे ते कपडे स्वच्छ करून घातले, तर आपण सुंदर दिसतो, हे समजावून सांगितले आणि फायनली सर्वांनी आंघोळ केली तेव्हा सर्वांचे उजळलेले चेहरे बघून मला खूप आत्मिक आनंद झाला. स्वच्छतेसाठी वारंवार पाठपुरावा करू लागले. बालकथा बोधकथा यांचाही आधार घेतला. विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास जागा झाला. सर्व विद्यार्थी केसांना मेहंदी लावायचे. मुले केस वाढवायचे. वेगवेगळ्या स्टाईलने केस कापायचे, त्यांच्या त्या सवयी पूर्णतः बदलून टाकल्या. पुन्हा केसांना मेहंदी लावायची नाही, केस खराब होतात. मेहंदी न लावता केस सुंदर दिसतात. मुलांच्या हातातील कडे, मुलींचा मेकअप, लिपस्टिक लावून शाळेत येणं हळूहळू बंद केलं. शाळेत आरसा, कंगवा, नेलकटर याची व्यवस्था करून ठेवली. सुट्टीत हात- पाय धुण्यासाठी साबण, नॅपकिन आणून ठेवला. स्वच्छता केल्यानंतर विद्यार्थी पुन्हा पुन्हा आरशात बघू लागले. जेवणाच्या आधी हात पाय धुऊन श्लोक म्हणणं. मगच जेवण. हा नित्यक्रम झाल्याने एखादा विद्यार्थी जर हा नित्यक्रम भंग करत असेल तर दुसरे विद्यार्थी तक्रार करू लागले. एकूणच विद्यार्थ्यांनी हे सर्व स्वीकारलं होतं आणि त्यांना आवडलं ही होतं. दूर दूर राहणारे विद्यार्थी आता माझ्याभोवती घोटाळू लागले बोलू लागले, सांगू लागले. ते आता प्रगतीची प्रकाशवाट चालू लागले. 




































... क्रमशः

--आशा चिने, शाळा गुरेवाडी, सिन्नर.

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect