#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday, 30 June 2019

प्रगतीची प्रकाशवाट सदर ८



प्रगतीची प्रकाशवाट सदर ८

...अखेर गुरेवाडीच्या प्रगतीची वाट प्रकाशमय झाली.



     आता महत्त्वाचा प्रश्न होता तो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा. एकूण सर्वच वातावरण बघता... मला अंदाज होता, की मला अजून किती काम करायचं आहे. विद्यार्थी सकाळी शाळेत वेळेवर येत नव्हते. दररोज हजर राहत नव्हते. दिलेला अभ्यास वेळेवर करत नव्हते. अभ्यासाच्या सवयी लागण्याची सुद्धा सवय लावावी लागते. त्यात नावीन्य हवं असतं. प्रलोभने देऊन, विविध क्लुप्त्या वापरून, नाविन्यपूर्ण पद्धती वापरूनच विद्यार्थ्यांना शाळेची आवड तयार होते. एकूणच काय तर विद्यार्थ्यांना काय आवडतं याचा शोध घेऊ लागले आणि नकळत तेही उत्तर मिळाले ! 





जसं पावसाच्या सरींनी मन धुंद होतं,


वातावरण आल्हाददायक बनतं,
... अगदी तसंच !

     अशी वातावरण निर्मिती फक्त हलक्याफुलक्या उपक्रमांनीच होईल व शिक्षण आनंददायी बनेल. म्हणून मी लागलीच अशा उपक्रमांची यादी बनवली. 


➤ अप्रगतसाठी माझे उपक्रम

⟹ डिजीटल ज्ञानरचनावाद

⟹ माझा ज्ञानरचनावाद

⟹ टाकाऊपासून शैक्षणिक साहित्य निर्मिती

⟹ इ लर्निंग

⟹ नाव पट्ट्या

⟹ चित्रात रंग भरणे

⟹ बालमित्र सदर

⟹ मातीकाम

⟹ लक्षात ठेवा व लिहा

⟹ शब्द्चक्र व गम्मत

⟹ जोडोब्लॉक

⟹ खड्यांची कलाकृती

⏩ गृहभेटी - एक यशस्वी उपक्रम

⏩ वृक्षारोपण करूया नवजीवनासाठी

⏩ स्वच्छता

⏩ पालकत्व

⏩ मोकळीका

वरील सर्व उपक्रम बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा....

        खूप सारे विद्यार्थ्यांच्या आवडीचे साधे व सोपे उपक्रम घेतले. हे उपक्रम खूप उपयोगी ठरले. खूप भिन्न असणाऱ्या परिस्थितीत असे उपक्रम विद्यार्थ्यांना बहरण्यासाठी मदत करून गेले. विद्यार्थ्यांच्या वाचन लेखनात कमालीचा बदल जाणवू लागला. त्यांच्यातील आत्मविश्वास चकाकू लागला.

         अस्वच्छता, अनुपस्थिती व गुणवत्ता या त्रिसूत्री वर रामबाण ठरले. असे हे उपक्रम नक्कीच प्रभावी आहेत असे मला वाटते.  

      यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे बदल मी बघितले. शाळेची आवड नसणारे, अभ्यासाची आवड नसणारे, विनाकारण शाळेतून पळून जाणारे, खेळाच्या नावाखाली शाळेत न येणारे सगळेच विद्यार्थी आता आवडीने शाळेत येऊ लागले. शिक्षक आपलेसे वाटल्याने शाळासुद्धा आपलीशी वाटू लागली. विद्यार्थ्यांच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, प्रत्येक गोष्टीत बदल जाणवू लागला. शासनाने प्रत्येक इयत्तेला ठरवून दिलेला पाठ्यक्रम शिकवावा की त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून आपली अध्यापन पद्धती राबवावी हे तेथील शिक्षकाला समजलं पाहिजे तरच असे विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवाहात येतील. मलाही समोर असलेल्या परिस्थितीत स्वतःची अध्यापन पद्धती वापरावी लागली आणि त्यामुळे घडून आलेला बदल माझ्यासाठी अविश्वसनीयच होता. 

      विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा खेळ आणि नाचणे फार आवडते. उपस्थितीचा प्रश्न असणाऱ्या या भागात मला त्यांच्या याच आवडीचा फायदा करून घेता आला. विद्यार्थ्यांना परिपाठात तसेच मधल्या सुट्टीनंतर किंवा एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या मर्जीनुसार विविध बालगीतं बसवले. याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्यांची नाचण्याची इच्छा पूर्ण होऊ लागली व आपल्या सवंगड्यांसोबत आपल्याला नाचायला मिळते, त्यामुळे विद्यार्थी शाळेचा रस्ता धरू लागले. दिवाळीच्या सुट्टीनंतर उपस्थितीवर परिणाम होतो म्हणून मी शाळेत स्नेहसंमेलन आयोजन करण्याचे ठरविले. दररोज तयारी घ्यायचे. आपल्यालासुद्धा सहभाग घेता यावा म्हणून प्रत्येक विद्यार्थी दररोज शाळेत येऊ लागला. दरम्यानच्या काळात १००% उपस्थिती होती. याचाच फायदा घेत मी विद्यार्थ्यांकडून हवा तसा अभ्यास करून घेऊ लागले. गावालाही हे सगळं नवीन वाटत होतं कारण यापूर्वी स्नेहसंमेलन शाळेत झालेलं नव्हतं म्हणून त्याची तयारीपासून स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा होईपर्यंत गावात उत्साहाचे वातावरण होते. 

      २६ जानेवारी २०१९ ला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडावंदन झाल्यानंतर बालाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा गुरेवाडी गावातील ऐतिहासिक क्षण झाला. कारण यापूर्वी कधीही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बघून या सगळ्यांचे खूप कौतुक वाटले. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग घेतला. एकूण १४ गीते बसविली. त्यासाठी लागणारा मंडप, बॅनर, कॉस्च्युम, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी चा सर्व खर्च मी केला. हे सर्व बघून गाव अवाक् झाले. माझ्यासाठी सुद्धा हा खूप आनंदाचा क्षण होता कारण त्यातून मला आत्मिक आनंद मिळाला होता. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हा मला देवाच्या चरणी अर्पण केलेल्या फुलापेक्षाही जास्त वाटला. गावासाठी आता मी जणू गळ्यातील ताईत झाले होते. गाव माझ्या शब्दांवर, सांगण्यावर विश्वास ठेवत होते ; नव्हे त्यांना विश्वास बसला होता. पालकांचा शिक्षणावर विश्वास बसला. पालक आपल्याच बालकांचा कौतुक करू लागले. .....आणि अखेर गुरेवाडीच्या प्रगतीची वाट प्रकाशमय झाली.

     ह्या एका शैक्षणिक वर्षातील गुरेवाडी शाळेत झालेला हा बदल अविश्वसनीय होता. मला मिळालेली संधीचं मला सोनं करता आलं असं मला वाटतं. 

     गुरेवाडी शाळेतील माझ्या कामाने माझ्या आयुष्यात ही खूप सारे बदल घडवून आणले. सिन्नर तालुक्यात माझी नवीन ओळख तयार झाली. आणि त्याच सोबत माझी नव्याने बदली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे तालुका सिन्नर येथे झाली. 16 जून 2019 ला मी नवीन शाळेत रुजू झाले व गुरेवाडीतील माझा प्रवास एक वर्षातच संपला. ह्या एका वर्षातील गुरेवाडी शाळेतील माझा प्रवास माझ्या अखंड सेवेतील अविस्मरणीय काळ राहील.

आशा चिने, गुरेवाडी...
(कार्यकाळ ३१/५/२०१८ ते १५/६/२०१९)
...........समाप्त
गुरेवाडी शाळेचा संपूर्ण शाळा प्रवास ...नक्की पहा ..





नवीन शाळा
जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक


...१६/०६/२०१९ पासून ....

1 comment:

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect