#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday, 21 October 2018

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर ४ ...शाळाबाह्य विक्रम पुन्हा शाळेला आला....

*शाळाबाह्य अन् शिक्षण !*

 अन् विक्रम पुन्हा शाळेला आला...


            शिक्षण म्हंजी काय रे भाऊ ?
       असं म्हटलं जातं की शिक्षणाने माणूस शहाणा होतो. माझ्याही मनात हा प्रश्न आहे की खरंच शहाणं होण्यासाठी शिक्षणच लागतं का? एकीकडे ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालाय अन् दुसरीकडे मात्र गरिबांच्या शिक्षणाचीच भ्रांत? जिथं माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याचाच मोठा प्रश्न आहे. तिथं ह्या शिक्षणाच्या आणाभाका काय कामाच्या? पोटाची खळगी भरायची कशी? आजची सोय झाली, आता उद्याचं काय? उद्या चूल पेटेल की नाही? असे कित्येक प्रश्न. गरीब- श्रीमंतांतील दरी वाढते आहे. त्यामुळे आज सक्तीचा शिक्षण कायदा अस्तित्वात असूनही शाळाबाह्य मुलांचा प्रश्न मोठाच आहे.

         "सर्वांना शिक्षण" हे ऐकण्यास कितीही छान वाटत असलं तरी, त्याच्या वास्तविकतेला झुगारून चालणार नाही. अशिक्षित पालक (समाज) आणि त्यांची गरिबी हे शिक्षणाला अडसर ठरणारे घटक. गावात पाणीटंचाई, दुष्काळ, अस्वच्छ्ता यांचा जर महापूर असेल तर गरिबी अन् रोगराई जन्म घेणारच ना! गरिबीमुळे शिक्षण कितीही स्वस्त असलं तरी ते नकोस वाटू लागतं. गावातील लोक कामधंद्यानिमित्त सकाळपासून सध्याकाळपर्यंत परगावी जातात. तेवढाच एक रोज मिळेल म्हणून हाताशी आलेल्या लेकरालाही नेतात किंवा छोट्या भावंडाना सांभाळण्यासाठी घरी तरी ठेवतातच. बालमजूर केव्हाच जन्माला येतो. वीटभट्टी, भाजी काढणे, शेतातील इतर मजुरीची कामे या सर्वांच्या इतकी अंगवळणी पडतात की पाटी पेन्सिल नकोशी वाटते. त्यातून मन उबगते. पालक थकतात तेव्हा किंवा इतर कारणांनी व्यसनांचा सहारा घेतात. दारू, गुटखा, तंबाखू हातात आले म्हणजे नकळत घरगुती हिंसेलाही वळण लागते. अन् हळूहळू नित्यक्रमच. 

        जिथल्या गावात अशी परिस्थिती असेल, त्या गावाचा अन् शाळेचा विकास फक्त देवदूतच करू शकतो. हो! *माझ्या गुरेवाडी शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा विक्रम खूप दिवसांपासून गैरहजर होता.* मी दररोज त्याच्या घरी जायचे पण घराला कुलूप असायचे. मजूर वर्ग असल्याने शेजारी कुणी भेटेल अशी शक्यता कमीच. अन् भेटले तरी त्याच्याविषयी बोलणे टाळत असे. काय कारण असेल? कुठे गेला असेल तो? गावात कोणालाच माहित नाही का? कोणीच सहकार्य का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न. वर्गातल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर तो गावाला गेल्याचे समजले, पण कुठे? नाही माहित! दररोज तोच उद्योग. विक्रमचे काही समजले का रे! गावातच राहणारी विक्रमची आत्या म्हणाली, "विक्रमच्या आई- बापाचं भांडाण झालं अन् विक्रमची आई त्याला सोबत घेऊन माहेरी सोनगिरीला गेली अन् आता विक्रम आईसोबत मामा-मामी कडं राहतो." आत्याने सांगितले की त्याच्या आजीची भेट घ्या.

         मजुरीहून येताच त्यांनी आजीला निरोप दिला. तेव्हा दुसऱ्या दिवशी आजीची भेट झाली. त्यांनी सांगितलं की सुनेच्या दहव्याला येणार हायती. पण कसलं काय? विकोपाला गेलेलं भांडण तिथं काय हा दहावा काय करेल? झालं! पुन्हा आजीशी चर्चा! काय झालं? पण ती आजी आज ह्या मळ्यात तर उद्या त्या मळ्यात. कशीबशी भेट घेतली! "आम्ही फोन केला पण ती फोनवर येत नाही! तिला इकडं यायचंच नाही!" असं आजी बोलली. "मला नंबर द्या," म्हटलं तर "इकडचे फोन उचलत नाही", असं हजरजबाबी उत्तर. मग मी विनंती, उद्बोधन केलं की, "तुमच्या भांडणात विक्रमच शैक्षणिक नुकसान होतंय", तेव्हा कुठं नंबर मिळाला. लगेच फोन केला तर तिकडच्या आजी बोलल्या की, "त्याचा दाखला देऊन टाका!" फोनवर दाखला! मला क्षणासाठी वाटलं की खरंच खूपच सुधारणा झाल्यात वाटतं! आपल्यालाच अजुन माहीत नाही. त्यांना समजावून सांगितलं व मी विक्रमला घ्यायला येते, त्याला माझ्यासोबत पाठवा, अशी विनंतीवजा सूचना केली. त्याच्या आईशी बोलून सकाळी सांगते. असं उत्तर आजीकडून मिळालं. 

        दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन केला व काय ठरलं? असं विचारलं! तर या तुम्ही घ्यायला म्हणून होकार मिळाला. अर्धा गड सर झाला! शनिवार होता,  सकाळची शाळा. गुरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा मॅडमची परवानगी घेऊन विक्रमच्या गावी 'सोनगिरी' येथे निघालो. सिन्नर पासून वीस किलोमीटरचे अंतर. सोबत विक्रमच्या बहिणीला घेतलं. खूप बिकट, आडवळणी, दऱ्या खोऱ्यांचा अन् खराब रस्ता! मजल दर करत सोनगिरीला पोहचलो. विक्रमला बघून मला खूप आनंद झाला. उरलेला अर्धा गड पूर्ण सर झाल्यासारखं. सर्वजण व्यवस्थित वागले,पण "मी येणार नाही!" असं विक्रमच्या आईचं वाक्य मला रडवेलं करून गेलं. मग त्याच्या शाळेचं काय असा प्रश्न मी लगेच टाकला, तर "त्याला घेऊन जा व सांभाळा". असं विक्रमची आई बोलली. तेव्हा मला हायसं वाटलं. विक्रमला घेऊन आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. शाळेत पोहचताच विक्रम आपल्या मित्रांसमवेत लगेच मिसळून गेला. गावातील मंडळी ही हे चित्र बघून अवाक् झाली व आश्चर्य व्यक्त करू लागली. 

        खरं तर विक्रम शाळाबाह्य झाला त्याला कारण होतं नवरा - बायकोचं भांडण. विक्रमसारखे आणखी दोन चार विद्यार्थी शाळाबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. वीटभट्टीला जाणे, जनावरे चारणे व आई बापासोबत मजुरीने जाणे म्हणून कुटुंबे स्थलांतरित आहेत. अशा गांजलेल्या समस्या असेल तिथं शिक्षक काय करणार? आणि गुणवत्ता नावाच्या शस्राला तरी कुठवर धार राहणार,! म्हणून शासनाने गावातच किमान रोजगार उपलब्ध करावा, नाहीतर शिक्षण नावाच्या हत्याराला गरिबीच्या जगात शून्य किंमत राहील! 
पहा व्हिडिओ




लेखिका, वर्गशिक्षिका
आशा ज्ञानदेव चिने
शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर, नाशिक

आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा..




Saturday, 20 October 2018

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर 3-शिक्षणावर बोलू काही..!

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर 3


     शिक्षण म्हणजे काय? आणि शिक्षण घेतल्याने काय होतं? प्रत्येकालाच क्षणभर गोंधळात टाकणारे प्रश्न. आपलं संपूर्ण आयुष्यच या 'शिक्षण' नावाच्या शब्दाभोवती फिरत असतं. आज या लेखामध्ये मी शिक्षणावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. 



       आपला 'सर्वांगीण विकास' हा शिक्षणामुळे होत असतो. यामध्ये "शालेय शिक्षणाचे" अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला "शाळेत मिळालेले संस्कार, मूल्य यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो." आज शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व निःशुल्क शिक्षण मिळण्याची कायद्यात तरतूद केली आहे. हा बालकांचा हक्क आहे आणि बालकांना शाळेत पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. असं जर असेल तर मग प्रत्येक मूल शिकलं का? आजही निरक्षरता आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण हेच सांगत आहे की अजून या कायद्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासानुसार त्यांच्या अहवालात किमान तीन कोटी मुलांनी अद्याप शाळेचे तोंडही पाहिलं नाही. फी चा प्रश्न, गळती, आदिवासी किंवा दलित विद्यार्थ्यांच्या समस्या, या सर्वांचा विचार केला तर हा आकडा खूपच मोठा होईल ! 


      प्राथमिक शिक्षण सक्तीचे करताना ते तितकंच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावं यासाठी प्रयत्न होणे फार महत्वाचे आहे. शैक्षणिक ध्येयधोरणे ठरवली जात असताना 'जनसहभाग' असणं तितकंच गरजेचं आहे, कारण "शिक्षण म्हणजे फक्त शिक्षकांची मक्तेदारी नाही!" प्रत्येक मूल जर शिकायला हवं असेल तर त्याच्या पालकाचाही तितकाच विचार व्हायला हवा! कारण शिक्षण जरी सक्तीचं असलं तरी पालकाच्या त्याच्या आपल्या स्वतःच्या गरजा असतात त्या कुठून भागणार ? खेड्यातील पालक तितके सुज्ञ नसतात! गरीबी, स्थलांतर, अंधश्रद्धा अशा समस्यांनी जखडलेला पालक नकळत मुलाला शिक्षणापासून दूर सारतो. अडाणी पालकाला सक्तीच्या शिक्षणाचा कायदा समजत नाही. त्याला शिक्षणाचे महत्त्व नसते. सांगितले तरी त्याला पटेलच असे नाही! त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पुढची गरजच नसते. 



     एकीकडे खेड्यात ही परिस्थिती असताना, शहरातही वेगळ्या समस्याच असतात. शहरातील मुलं शिक्षण घेऊन सुसंस्कारित होतीलच असं तर नाही! केवळ पुस्तके, परीक्षा अन् नोकरी याच्या पलीकडे शिक्षणाचे महत्त्व नाही का? सध्याची शिक्षणपद्धती म्हणजे रोबोट बनविण्याचा कारखानाच म्हणा न! देशाची प्रगती, मार्गदर्शक तत्त्वे, मूल्ये, आदर्श सुजान नागरिक हे सगळ्या बाबी नकळत पायदळी तुडविल्या जात आहेत. अन् इंटरनेटच्या जगात तर शिक्षणाचे तीन तेराच वाजले आहेत!



      "पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण" या संकल्पना कुठेतरी मोडकळीस निघाल्या पाहिजे. स्वतःला सुज्ञ म्हणवणारा हा समाज मात्र अजगरासारखा निपचित पडला आहे! शिक्षणाचा खरा अर्थ येणाऱ्या पिढीला समजला पाहिजे, यासाठी तुम्हां आम्हांला पाऊल उचलण्याची गरज आहे. यासाठी सामाजिक भान ठेवत आपली नैतिक जबाबदारी उचलणं हेच खरं शिक्षण! "शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे" तिला एका साच्यामध्ये टाकून चालणार नाही! 



        प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण एक बाजू बघितली. आता या नाण्याची दुसरी बाजू. तुम्ही आम्ही घेतलंल शिक्षण! खरंच, मिळालेल्या शिदोरीवर आपण अजूनही स्वतःला समृद्ध करत आहोत! "सर्वांना शिक्षण मिळावे" म्हणून धडपडणारे शिक्षण प्रेमी आपल्या समाजात आहेत. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था आहेत. शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लाभलेला समाजसुधारकांचा वारसा आहे. हे सर्व शिक्षणाचे फायदे अधोरेखित करतात !



      माझ्या मते, "शिक्षण म्हणजे माणसातला माणूस घडवणं, स्वतःची नैतिक जवाबदारी समजणं, ज्ञानाची जोपासणा करणं, शिक्षणात स्वतःच्या आवडीला प्राधान्य देणं, असलेल्या ज्ञानाला व्यावसायिकतेची जोड असणं, स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणार संशोधक वृत्तीचा ज्ञान असणं, गुणवत्तेशी तडजोड न करणारे स्वातंत्र्य असणं म्हणजे खरं शिक्षण."



     "शिक्षण" या विषयी अनेक मतमतांतरे असू शकतात. माझ्या मताशी सर्वच सहमत असतील असं नाही. काही महत्त्वाचे मुद्दे सुटलेही असतील! मी फक्त माझा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद!


लेखिका: आशा ज्ञानदेव चिने

प्राथमिक शिक्षिका

जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी 

ता. सिन्नर, नाशिक

आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा...



Saturday, 13 October 2018

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर २

सदर २ वाचण्याआधी
क्रमशः .....
     मशालफेरीचा कार्यक्रम छान पार पडला अन् सर्वांच्याच आठवणीतला तो '१५ जून ' शाळेचा पहिला दिवस अखेर उगवला. आमच्या गुरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका 'पद्मा मॅडम'. त्यांनी "टेंशन घेऊ नका, करू आपण हळू हळू!" असं म्हणत मला खूप धीर दिला. तरी माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह काही माझी साथ काय सोडायला तयार होईना! शैक्षणिक सूर्यमालेतील तो सर्वांत मोठा दिवस, सकाळी ७.०० ते सायंकाळ ५.०० वाजेपर्यंत. स्वच्छता करताना साधारण दोन तीन गोण्या गुटखा, तंबाखू व तत्सम रॅपर, दारूच्या बाटल्या अन् झाकणं गावात किती "व्यसनं" आहेत याची साक्ष देत होते. जेव्हा साफसफाई चालू होती, तेव्हा गाव जणू ताठ मानेने बघत होता, जणू काय युध्दात विजय मिळवलाय! त्यांना कदाचित मी सफाई कामगार तर वाटले नसेल ना!


     शाळा प्रवेशोत्सव, प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत, गणवेश - पाठ्यपुस्तक वाटप, काही सक्तीचे अन् अनासक्तीचे उपक्रम. दरवर्षीप्रमाणे याही शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली. माझ्या अंगवळणी पडलेल्या काही उपक्रमांची चलती इथेही रूप घेत होती. आपण जेही करू ते सर्वांसाठी नवीनच असेल, म्हणून ते कितपत पचनी पडेल? असा दबका सुर कामात थंडपणा आणत होता. मला सर्वच नवीन असल्याने कोणाला किती मान द्यावा? ह्याच्या नादात मान हलवून हलवून दुखू लागली. चेहऱ्यावर एक स्माईल दिवसभर टिकवताना स्माईल केव्हा गालाला चिकटून गेली कळलेच नाही. 



      बाहेरच्या परिसरात भिरभिरणाऱ्या माझ्या नजरा आता आतला परिसर (म्हणजे वर्ग) पाहण्यासाठी उत्सुकल्या होत्या. परिसरात नजरेचे थैमान चालू असतानाच पाऊले आता वर्गाकडे कूच करत होती. अन् ती वर्गात किती वेळ अडखळणार ? अडखळणार की नाही? असे विचार मनात टाकीचे घाव घालत होते. तळेवस्तीच्या विद्यार्थ्यांचे चेहरे नेहमीच नजरेसमोर ठेऊन खूप सारे दिव्य केले होते. बरेचसे प्रयोग सिध्दीस नेले होते. का कुणास ठाऊक ? गुरेवाडीच्या विद्यार्थ्यांत तसा एक तरी चेहरा दिसावा म्हणून मन उगीच स्वतःला धीर देत होते. मी स्वतःहून विद्यार्थ्यांशी सलगी करताना ते मात्र अंतराने (अदबीने) वागत. त्यामुळे परकेपणाची जाणीव जोर धरत होती. 



         वर्गात पाऊल ठेवताच मनाच्या गाभाऱ्यात    गर्द झालेल्या काळोखाने आता विचित्र सावटाचे रूप घेतले होते. इतक्या वेळापासून उत्कंठा शिगेला असतानाच समस्यारुपी ड्रॅगन समोर उभा ठाकला. हा आपल्याला जणू गिळंकृत करेल की काय? असा तीव्र आवाज घणाणू लागला. क्षणार्धात मला पुढे काय वाढून ठेवले आहे याची स्पष्ट कल्पना आली. अन् समोर "आ" वासून उभ्या असणाऱ्या समस्यांनी जणू मला घेरले. एक विशिष्ट वास (कारण विद्यार्थ्यांनी आंघोळ केल्या नव्हत्या), आवाज, विद्यार्थ्यांचे राहणीमान, वर्गातल्या त्या कोऱ्या, बेरंग भिंती अन् कोपरे माझ्याकडे एकटक बघत असल्यागत भासत होते. शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली शासनाची अध्ययन समृद्धीची भाषा - गणितची पेटी फक्त. माझ्या वर्गात टेबल व खुर्ची असावी अशी माझी माफक इच्छा होती, झोका खाणारा टेबल का होईना! पण माझी ती इच्छा पूर्ण झाली. तळेवस्तीला असताना मी नेहमी विद्यार्थ्यांच्या छोट्या बेंचवरच बसले, कारण वर्गात टेबल नव्हताच! खुर्ची पकडण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी हितगुजलाच मी प्राधान्य दिले. पद्मा मॅडमही मधून मधून मला विद्यार्थ्यांविषयी, तिथल्या परिस्थितीविषयी मार्गदर्शन करत होत्या.





     विद्यार्थी काहीतरी बोलतीलच! अशा आविर्भावात मी असतानाच पुरता हिरमुड! ती काहीच बोलली नाहीत. "कदाचित बदल रुचत नसावा." माझी ओळख करून देत, मी त्यांचीही ओळख करून घेत होते. विद्यार्थ्यांची सुंदर सुंदर नावे ऐकून मीही संभ्रमात पडले होते, पालक तर अडाणी मग नावे एवढी सुंदर कशी? छान वाटलं ऐकून. पण कपाळ! एक नाव लक्षात राहिल म्हणून. अन्  लगेच आठवलं की तळेवस्तीचे बरेचसे 'नामकरण विधी' मी नाव दाखल करतानाच पार पाडले होते. 


        अस्वच्छता नावाचा भला मोठा ड्रॅगन गुरेवाडीत वास्तव्यास होता. त्याने आपला डंख न मारला तर नवलच. अंगावर मळकट कपडे अन् आंघोळ न केल्याने वातावरणात विचित्र अशांतता. काय कारण आहे? विचारूनही समाधान होईना. उत्तरात फक्त विशिष्ट प्रकारे हसणं, लाजणं. काय समजू ह्याला? समोर घडणाऱ्या साऱ्या परिस्थितीने माझं हळू हळू वादळात रूपांतर होऊ लागलं. मी टाकलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नवीन प्रश्न! अंगाचा तिळपापड होऊ लागला. समोरच्या परिस्थितीने, वातावरणाने "माझ्यातील मी" पुरती हादरले. तळेवस्तीत परिपाठाचा नित्यक्रम होता. छंदच म्हणा न! ह्या नित्यक्रमाला पुरता तडा गेला. काही वेगळं करताना एका अनामिक भीतीने स्वतःला सावरत होते. 

       जेवणाच्या सुट्टीत छानसा श्लोक होईल अन् मग जेवणे, अशी अपेक्षा. पण कसलं काय! "अरे, भात खायला शाळा सुटलीsss ! असं म्हणत अख्खा चमू घराकडे पळाला. येताना हातात एक डबा घेऊन आले. अन् डबा कोणता? आई बापाने मजुरीला नेलेला असा एक डबा ज्यातला एक डबा, कडी अन् झाकण हरवलंय. मग उरलेला डबा म्हणजे ह्या चमूंची प्लेट. हात न धुताच चप्पल सहित बसले मांडी घालून. कोणी ओरडतंय, कोणी शिव्या देतंय! अन् आणखी बरंच काही. चला माझ्यामागे श्लोक म्हणा! मी असं म्हटलं तर आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले. हसू लागले. गावाचं तर विचारूच नका. न सुटणारं कोडंच! कदाचित मला वेडी म्हणायला पण कमी केले नसेल!

     गाणी, गप्पा, गोष्टी घेत मी विद्यार्थ्यांत मिसळण्याचा प्रयत्न करत होते. मनातून पण खोलवर हादरले होते. आणि विद्यार्थी , शाळा हा आवडीचा विषय असूनही घड्याळात किती वाजले बघत होते. दिवस काढत होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच माझ्या सदसद् विवेकबुध्दीने बदली अन् स्वेच्छा निवृत्तीचा विचार केला नसेल तर नवलच?

      आपली नाव दूरवर दिसणाऱ्या तटापर्यंत नेण्यासाठी सागराच्या गर्तेतील खोली, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करून उत्तम नावाडी बनायचं स्वप्न तग धरेल की नाही? हे उगवणारी "प्रगतीची प्रकाशवाट"च ठरवणार होती.
क्रमशः...


लेखिका: आशा ज्ञानदेव चिने
प्राथमिक शिक्षिका
जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी
ता. सिन्नर, नाशिक





....आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा

Tuesday, 9 October 2018

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर १


     ३१ मे २०१८ चा तो दिवस. बदली झाली अन् नवीन शाळा गुरेवाडी येथे रुजू होण्यासाठी सिन्नर मध्ये प्रथमच पाऊल ठेवलं. शाळा हायवेवरच असल्याने तशी एक उत्सुकता शिगेला पोहोचलेली. हायवेने जातानाच रस्त्याच्या दुतर्फा झाडे जणू हात पसरून स्वागतच करत होते. पोटातले अन्न शाळेत गेल्यावरच पचण्याच्या प्रतीक्षेत, रस्ताही तसा सुंदरच. कारण माझ्या अगोदरच्या शाळेत रस्त्याचा मोठा संघर्ष मी केलेला होता. पालकांच्या शेतातून कधी बांधानेच शाळेत जावे लागे. कधी शेतकऱ्याने शेत नांगरल्याने उतरून हातानेच गाडी लोटणे. पावसाळ्यात तर विचारूच नका. चिखल अन् पाणी. पावसाळ्यातलं जितकं छान दृश्य ! तितकाच मनस्ताप! कित्येक वेळा अपघात अन् दुखापत. पण या सर्वांच्या पलिकडे एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी, माझी जीव की प्राण असणारी शाळा तळेवस्ती. रस्त्याच्या बाबतीत म्हणाल तर प्रचंड अवघड शाळा. 
      बदलीच्या शाळेत रस्त्याचा त्रास तेवढा नसावा एवढीच माफक अपेक्षा! बदलीच्या शाळेत नक्कीच काहीतरी वेगळे व नाविन्यपूर्ण मिळेल अशी आशा घेऊनच आले होते. तालुका माझाच तरी आपल्याच तालुक्यात कसं परकं वाटत होतं. नवे ठिकाण, नवा तालुका, नवी शाळा, नवे विद्यार्थी, नवा शालेय परिसर, नवे अधिकारी व सहकारी शिक्षक, नवं घर ! नव्या गोष्टींचा केवढा आनंद असतो. नवीन संकल्पना, नवे उपक्रम, नवा उद्देश, एक छानसं नवं स्वप्न घेऊनच आले होते. शाळेसमोर उभी राहून शाळा कुठे आहे? असं विचारणं म्हणजे केवढा मोठा गहन प्रश्न. अन् ह्या सर्व नव्या कल्पना नजरेसमोरच मावळताना पाहिल्या. 
        शाळा अन् परिसर पाहून पायाखालची जमीनच सरकली. होत्याचं नव्हतं झाल्यासारखं वाटलं. नको नको त्या विचारांचं काहूर डोक्यात माजलं. एक आदर्श शाळा, विद्यार्थी, शिक्षक अन् जिवापाड प्रेम करणारे पालक या सर्वांना सोडून आल्याची जणू शिक्षाच मिळाली! काय सोडलं अन् कुठे आले हे समजण्याच्या पलिकडच्या गोष्टी होऊन बसल्या. गावाकडे बदली झाल्याचा आनंद पार विरून गेला. कुठूनतरी चक्रे फिरावी अन् परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी व्हावी अशी खोटी समजूत मनाला घालत होते, पण व्यर्थ! का हे देवाचंच नियोजन म्हणायचं ? स्वतःतील झोकून काम करण्याची वृत्ती, उपक्रमशीलता, नाविन्यता ह्या सर्व बाबी कशा फिक्या वाटू लागल्या. परिस्थितीला दोन हात करणारी मी पण पुरती गलितगात्र झाले. एकदम जुनी, रंगाचं कुठेही नाव नसलेली शाळा इमारत, निरस वातावरण, परिसर, शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या गावातील अबालवृद्ध क्रिकेटपटूंचा आमच्या तोंडाकडे एकटक बघणारा तो चमू अन् मे ची ती रखरखणारी दुपार भयानकतेत भर टाकत होती. 
       शाळेची आवार भिंत एकेकाळी शाळेचा वारसा जपत होती, पण तीच लोखंडी भिंत एक एक तार काढून दररोज दुपारी येणाऱ्या भंगार वाल्याच्या केव्हा स्वाधीन झाली हेही लक्षात आलं नसावं. या सगळ्यांची साक्ष देणारी निशाणी तेवढी बाकी राहिली ती अर्धवट भिंत. ती भिंत आता एका कट्ट्याच्या रूपात गावातील मंडळींना केव्हाही बसण्याचं हक्काचं ठिकाण बनलं. शाळेच्या इमारतीकडे तोंड करून बसायचं आणि शाळेत काय काय चालतंय याची गंमत बघायची.
        एकीकडे ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालेला असताना हे गाव मात्र त्या गावचंच नव्हतं. ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालेला असताना शिक्षणाची पाळेमुळे खोलवर रुजण्यासाठी ओलावा निर्माण झालाच नसेल का? तो ओलावा वरवरचा होता. की अंकुरण्याच्या आधीच पीक करपत होतं. जिथं एका नजरेत एवढी गांजलेली परिस्थिती काळजाचा ठोका चुकवत होती तिथं आतल्या परिस्थितीचा विचारही तितकाच भयावह होता. अंगातल्या त्राणाने केव्हाच मान टाकली होती. अन् अा वासून उभ्या असणाऱ्या या मळकट परिस्थितीने आजाराचा दरवाजाही केव्हाच उघडला होता.
      रुजू झाले अन् उन्हाळी सुट्टीचे १५ दिवस अजुन आपल्याकडे आहेत. या आविर्भावात सुट्टी आनंदात घालवण्याचा खोटा प्रयत्न करू लागले. सुट्टीही जरा लवकरच संपली. शाळेच्या आदल्या दिवशी शाळेत पोहोचले. स्वच्छता करायची पण कुठून अन् कशी. कारण समस्यांमधील मुख्य समस्या म्हणजे अस्वच्छता. दारू, तंबाखू, गुटखा, गांजा, जुगार व्यसनांचीच चलतीच होती गावात. आणि त्यासाठी एकमेव सार्वजनिक ठिकाण म्हणजे शाळा. रात्र अन् सुट्टी शाळेतच. तिथेच खा - प्या, तिथेच कचरा टाका अन् थुंका. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस म्हणजे अविस्मरणीय क्षणच झाला म्हणा न. ह्या सर्व परिस्थितीला कुठेही जबाबदार नसताना जर ऐकावं लागलं तर विचार करा ! मी आता काय पाऊल उचलावं? स्वतःला शांत ठेवत खोटा आव आणत स्वतःला गुरेवाडीच्या खोट्या साच्यात घालण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. 
        मशाल फेरी काढायची होती. कोणताही उपक्रम राबवताना सर्व फक्त स्वतःच्या मनाप्रमाणेच व्हायला हवं, अशी आग्रही असणारी मी पण मला कशातच रस वाटेना. हो ला हो अन् नाही ला नाही करत होते. मनाच्या एका कोपऱ्यात विचारांचं चाललेलं प्रचंड तांडव बाहेरचा आवाज अस्पष्ट करत होतं. तहान कसली? नी भूक कसली? काहीच नको. फक्त हा काळ थोडा मागे ढकला, ही चक्रे फिरवा. असा निरर्थक विचार तेव्हढा जोर धरत होता. संध्याकाळी मशाल फेरी काढण्यासाठी यावं लागेल. अधिकारी व गावकरीही हजर असणार म्हणून जबाबदारी उचलत जड मानेनेच होकार देत स्वप्नातल्या या चित्रात रंग भरू लागले. आम्ही शाळेत हजर होताच एक - एक करत मजुरीहून परतलेली मंडळी, क्रिकेट खेळून दमलेला तो चमू, पत्ते झोडून रिफ्रेश झालेली रिकामटेकडी मंडळी, सगळी हळू हळू शाळेत जमली. नव्या शिक्षिकेला बघण्याची इच्छा की अगोदरचे शिक्षक का नाही आले? हा त्यांना पडलेला प्रश्न. त्यांना आनंद झाला की नाही? याचं सध्या मला तरी काहीही घेणं नाही असा विचार डोक्यात न डोकावला तर नवलच. पण ही मंडळीही आपल्या हालचालीतून आपली जणू ओळखच करून देत होती. पुढे होऊन उगीच मदत करणं, सोबत आहोत असं दाखवणं, पुढे - पुढे येणं, हा कसला संकेत म्हणायचा? पण मदत करताहेत तर भविष्यातही करतीलच ! याची चिन्हे म्हणायची का? लग्नाच्या वरातीतला ढोल काय ताल धरेल? असा ताल धरत शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी ढोल वाजवला. अन् क्षणार्धात कार्यक्रमच कसला आहे? याचेही विस्मरण झाले. मी तर वरातीत शिरल्याचाच भास मला झाला. वातावरण पूर्णच बदललं. 
        मशालफेरीने गावाकडे मोर्चा वळवला. वाजत - गाजत अंधारात मशालीचा पडणारा उजेड गुरेवाडीतील ' प्रगतीच्या प्रकाशवाटे' चीच साक्ष जणू देत होता. त्या किर्र अंधाराला चिरत जणू ही मशाल एका परिवर्तनशील गुरेवाडीचा उषःकाल भासत होती. एक प्रकाशकिरण गुरेवाडीत या निमित्ताने पडला होता. अज्ञानाचा अंधकार जणू धुऊन गेला होता. ....
क्रमशः...
लेखिका: आशा ज्ञानदेव चिने
प्राथमिक शिक्षिका
जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी 
ता. सिन्नर, नाशिक
Blog: प्रगतीच्या प्रकाशवाटा

आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा... 

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect